सिंधुदुर्गात लवकरच मेडिकल कॉलेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:07 AM2018-05-28T00:07:23+5:302018-05-28T00:07:23+5:30
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील पडवे येथे तब्बल ६५० बेडचे जागतिक दर्जाचे लाईफ टाईम हॉस्पिटल सुरू झाल्याने येथील जनतेसह कोकणवासीयांना अधिक उपचारासाठी आता गोवा, कोल्हापूर, बेळगाव येथे जाण्याची गरज पडणार नाही. कोणत्याही आजाराचे योग्य निदान याठिकाणी अगदी माफक दरात केले जाणार आहेत. आगामी काळात महात्मा फुले जनारोग्य योजनेशी हे हॉस्पिटल जोडले जाईल. यामुळे गोरगरिबांना मोफत उपचार दिले जातील, असे सांगतानाच या मेडिकल कॉलेजची परवानगी अंतिम टप्प्यात असून, तेही लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कुडाळ तालुक्यातील पडवे येथील सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या लाईफ टाईम हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंधारण मंत्री राम शिंदे, कृपाशंकर सिंह, गोवा भाजपचे अध्यक्ष विनायक तेंडोलकर, गोव्याचे मंत्री जयेश साळगावकर, आमदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, रमाकांत खलप, आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी खासदार नीलेश राणे, डॉ. आर. एस. कुलकर्णी, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार व हजारोंच्या संख्येने जिल्हावासीय उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, सिंधुदुर्गसारख्या निसर्गरम्य तरीही ग्रामीण अशा भागात एवढे मोठे रुग्णालय उभारणे, हे मोठे धाडसाचे काम आहे. अशा प्रकारचे रुग्णालय राणे यांनी नवी मुंबई आदी भागात सुरू केले असते तर त्यांना मोठा बिझनेस मिळविता आला असता. मात्र त्यांना पैशांपेक्षा आपल्या माणसांच्या प्रेमाचा परतावा महत्त्वाचा वाटला म्हणूनच त्यांनी या जिल्ह्यातीलच नव्हे तर कोकणातील लोकांसाठी हे भव्य आणि अद्ययावत असे रुग्णालय सुरू केले आहे. हे रुग्णालय तयार करताना प्रत्येक छोट्यात छोट्या गोष्टीचा बारकाईने विचार केलेला दिसत आहे, असेही ते म्हणाले.
३७ हजार जणांवर मोफत उपचार
मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ‘मुख्यमंत्री आरोग्य सेवा’ ही नव्याने योजना सुरू केली. गेल्या साडेतीन वर्षांत दुर्धर आजाराने त्रस्त झालेल्या तब्बल ३७ हजार रुग्णांवर या योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार केले आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पर्यटन व रोजगार निर्मितीला चालना मिळणार : मुख्यमंत्री
या रुग्णालयामध्ये परदेशातील रुग्णांवर अगदी माफक दरात उपचार केले जाणार आहेत. विदेशी पर्यटक याठिकाणी आल्यास अर्थव्यवस्था वाढून रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.