वैद्यकीय अधिकाऱ्यालाच ‘स्वाईन फ्लू’
By admin | Published: March 27, 2015 12:33 AM2015-03-27T00:33:05+5:302015-03-27T00:35:24+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलाच रूग्ण
पुरळ : दोन महिने राज्याला सतावणाऱ्या स्वाईन फ्लूचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलाच रूग्ण देवगडमध्ये आढळला आहे. देवगड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी
डॉ. अमरेश अखिलेश आगाशे यांनाच स्वाईन फ्लू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली .
देवगड ग्रामीण रूग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. अमरेश अखिलेश आगाशे काही दिवसांपूर्वी पुणे येथे गेले होते. त्यानंतर देवगडात आले असता त्यांना व्हायरल फिवर झाल्याने ते आजारी पडले होते. देवगडाच्या खासगी रूग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविले असता २४ मार्च रोजी मिळालेला रक्त तपासणी अहवाल स्वाईन फ्लू पॉझिटीव्ह आला आहे.
डॉ. आगाशे यांच्यावर देवगड येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या पत्नीलाही या आजाराची लागण झाली असल्याने त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीकरिता पाठविले आहेत. त्यांनाही स्वाईन फ्लू झाल्याची लक्षणे आढळून येत आहेत. डॉ. आगाशे हे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचा आठ महिन्यांपूर्वीच विवाह झाला आहे.
देवगडात पहिला रुग्ण
देवगड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरेश अखिलेख आगाशे यांना स्वाईन फ्लू झाल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले. त्यांच्या पत्नींनाही स्वाईन फ्लू आजाराची लक्षणे आढळली आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथे पाठविले आहेत. स्वाईनचा रूग्ण देवगडामध्ये आढळल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे