वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द
By admin | Published: June 2, 2016 12:42 AM2016-06-02T00:42:04+5:302016-06-02T00:59:43+5:30
आरोग्यमंत्र्यांकडे शिफारस : कोकणातील डॉक्टरांचा अनुशेष भरून काढण्यासाठी घेतला निर्णय
सुभाष कदम / चिपळूण
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकाही वैद्यकीय अधिकाऱ्याची जिल्ह्याबाहेर बदली न करण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे ही मागणी केली होती. ही मागणी तत्त्वत: मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्याय झाला आहे. अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली.
कोकणात अनेक गावे दऱ्या खोऱ्यात व शहरापासून लांब डोंगराळ भागात आहेत. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची अवस्था अतिशय बिकट असते. राहायला चांगल्या खोल्या नाहीत की, गावात कोणत्या सोयीसुविधा नाहीत. जे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहून प्रामाणिकपणे सेवा करतात, त्यांच्याच नशिबी हा वनवास आलेला असतो. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सोयीसुविधा नसतात. ग्रामीण भागात रुग्ण कधीही येतात. त्यांना सेवा द्यावीच लागते. एखाद्याला नाही म्हटले तर वेळप्रसंगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाणही होते. तरीही अनेक वैद्यकीय अधिकारी आपल्या नोकरीला प्राधान्य देत इमानेइतबारे सेवा करतात. अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.
अनेक वैद्यकीय अधिकारी मोठ्या शहरात किंवा सोयीच्या ठिकाणी काम करायला प्राधान्य देतात. शासनाने नुकत्याच नियुक्त केलेल्या ४८२ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासन पाठवेल तेथे काम करू असे करारपत्र शासनाला दिले आहे. त्यांच्या कराराप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये हे वैद्यकीय अधिकारी काम करू शकतात; परंतु त्या ४८२ पैकी एकाही वैद्यकीय अधिकाऱ्याला रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये नियुक्ती दिलेली नाही. जर यापैकी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली असती तर येथे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्या कुटुंबाकडे जाता आले असते. वर्षानुवर्षे कुटुंबापासून लांब राहून प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या या अधिकाऱ्यांची आता अडचण झाली आहे.
ग्रामीण भागात काम करणाऱ्या किंवा संवेदनशील किंवा अडचणीच्या भागात जे वैद्यकीय अधिकारी काम करतात, त्यांना एक स्तर वेतन श्रेणी वाढ व प्रवास भत्ता दिला जातो. मात्र, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची स्थितीही तशी नाही. या भागात नवीन वैद्यकीय अधिकारी येण्यास धजावत नाहीत. त्यामुळे येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाने ही सुविधा द्यायला हवी, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांमध्येही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अनेक नवीन वैद्यकीय अधिकारी या भागात येऊ इच्छित नाहीत आणि आले तरी तत्काळ बदली करून निघून जातात. काही येथे सोयीसुविधा नसल्याने सोडून जातात. त्यामुळे येथील प्रश्न कायम आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा असल्याने पालकमंत्री वायकर यांनी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या न करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यानुसार हा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
प्रामाणिक अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न
येथे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक स्तर वेतन श्रेणीचा लाभ नाही किंवा बदल्याही नाहीत हे धोरण अयोग्य आहे. शासनाने यापेक्षा संपूर्ण राज्यातील बदल्या रद्द करायला हव्या होत्या. केवळ रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रयत्न असल्याचे काहींनी सांगितले.