गडसंवर्धनासाठी कॅबिनेटची बैठक रायगडावर व्हावी

By admin | Published: March 27, 2017 05:06 PM2017-03-27T17:06:08+5:302017-03-27T17:06:08+5:30

संभाजीराजे छत्रपती : पर्यटनवाढीसाठी ‘सी-टूरिझम’ प्रकल्प राबविणार

The meeting of the Cabinet for Gadchandhana should be done on Raigad | गडसंवर्धनासाठी कॅबिनेटची बैठक रायगडावर व्हावी

गडसंवर्धनासाठी कॅबिनेटची बैठक रायगडावर व्हावी

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : गड-किल्ल्यांची पर्यटनाला जोड दिल्याशिवाय महाराष्ट्रातील किल्ल्यांचा विकास होणार नाही. पर्यटनवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘सी-टूरिझम’ योजनेंतर्गत सहा जलदुर्गांचा समावेश करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील किल्ले व गडांचे संवर्धन करण्यासाठी तसेच वारसास्थळांचे जतन करण्यासाठी राज्याच्या कॅबिनेटची बैठक रायगडावर घेण्यात यावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली.

राज्यातील गड-किल्ले प्रथम पर्यटनाला जोडावेत हा माझा प्रथमपासून अजेंडा असल्याचे सांगून खासदार संभाजीराजे म्हणाले, रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव झाल्यामुळे हा सोहळा संपूर्ण देशभरात गणला गेला. त्यातूनच मला राज्यसभेवर खासदारपदी सन्मानित केले. रायगडचे जतन आणि विकास कामासाठी पाठपुरावा केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे ६०० कोटी रुपये मंजूर केले. त्यापैकी २०० कोटी हे रस्त्यावर तर उर्वरित ४०० कोटी रुपये गडसंवर्धन व परिसरातील वाड्या-वस्त्या सुधारण्यावर खर्च करण्यात येणार आहेत पण शासनाकडे मंजूर झालेल्या आराखड्यात बदल होण्याची आवश्यकता आहे. पहिल्या टप्प्यात रायगडप्रमाणेच पाच ‘मॉडेल फोर्ट’ करावेत, अशी माझी मागणी आहे. यापैकी सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी निधी मंजूर झाला असून आणखी तीन किल्ल्यांचा आराखडा तयार करून विकासासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू, असेही खासदार संभाजीराजे म्हणाले.

‘सी-टूरिझम’ राबविणार

राज्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी किल्ल्यांची जोड देणे आवश्यक आहे. राज्यात ‘सी-टूरिझम’ योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी खांदेरी, उंदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, मुरूडा, जंजिरा हे किल्ले जलमार्गाने एकत्रित जोडण्यात येणार आहेत. या सर्व किल्ल्यांसाठी बंदरची मागणी शासनाकडे केली आहे तर उंदेरी आणि पद्मदुर्ग या दोन किल्ल्यांवर बंदरला परवानगी शासनाने दिली आहे. शासनाने आपली निवड केलेल्या ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ या पदाचा त्यासाठी फायदा झाला आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्याची आणखी दिव्यता

राजगडवर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा प्रतिवर्षी दिमाखात होतो, तो सोहळा आणखी दिमाखदार पद्धतीने कसा होईल यावर आगामी काळात मी भर देणार आहे. महाराष्ट्रातील वारसास्थळांचे तसेच इतिहासातील गड व किल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी वारसास्थळ जतन धोरण आखणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या कॅबिनेटची बैठक रायगडावर घेण्याची माझी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे.

स्वच्छ कोल्हापूर, स्वच्छ पंचगंगा

स्वच्छ कोल्हापूर आणि स्वच्छ पंचगंगा नदी हे दोन ‘ड्रीम प्रकल्प’ माझ्याकडे आहेत, त्यासाठी ‘नमामी पंचगंगा’ असा प्रकल्प राबिण्याचा आपला मानस आहे. आपल्या वाढदिवसापासून या मोहिमेचा प्रारंभ केला असून राज्यातील सुमारे १०३ किल्ल्यावर एकाचवेळी स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविली, त्याची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे.

शाहू मिल रोजगाराचे केंद्र बनावे

कोल्हापूरची अस्मिता असणारे छत्रपती शाहू मिल हे स्मारक करण्यासाठी राज्य शासनाने घोषणा केली होती; पण येथे पुतळे उभारून स्मारक करण्यापेक्षा तेथे गारमेंट अगर इतर प्रकल्प आणून कामगारांच्या रोजगाराच्या माध्यमातून हे जिवंत स्मारक बनावे अशीही अपेक्षा खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त करून यासाठीही आपण लवकरच पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ, श्रेष्ठ नंतर, प्रथम एकत्र विकास

कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी माझी आणि धनंजय महाडिक व राजू शेट्टी यांचीशी चर्चा होऊन एकत्र काम करण्याची तिघांनीही तयारी दर्शविली आहे. त्यामध्ये ज्येष्ठ, श्रेष्ठ कोण हे नंतर पाहू प्रथम जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र पाठपुरावा करण्याचीही तयारी दर्शविली आहे, असेही खासदार संभाजीराजे म्हणाले.

Web Title: The meeting of the Cabinet for Gadchandhana should be done on Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.