कुणकेश्वरात आज भरणार शिवभक्तांंचा मेळा

By admin | Published: March 6, 2016 11:16 PM2016-03-06T23:16:02+5:302016-03-07T00:36:32+5:30

तीन दिवस यात्रोत्सव : भाविकांची गर्दी होणार ; प्रशासकीय यंत्रणा सज्ज

A meeting of Shiva Bhavakars held in Kukeshwar today | कुणकेश्वरात आज भरणार शिवभक्तांंचा मेळा

कुणकेश्वरात आज भरणार शिवभक्तांंचा मेळा

Next

कुणकेश्वर : श्री देव कुणकेश्वर यात्रोत्सवास सोमवारपासून भक्तीमय वातावरणात सुरुवात होणार आहे. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून कुणकेश्वरनगरी शिवभक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.
रविवार रजेचा दिवस असल्यामुळे राज्यभरातील ठिकठिकाणावरून भाविक कुणकेश्वरात येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता देवस्थान ट्रस्टने वर्तवली आहे. दरम्यान, यात्रोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा, आरोग्य विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत, पंचायत समिती, देवस्थान आणि ग्रामस्थ असे सर्व विभाग सज्ज झाले आहेत.
आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर यात्रा परिसर, समुद्र किनारा झळाळून निघाला आहे. विविध प्रकारची दुकाने आणि भाविकांच्या वर्दळीमुळे कुणकेश्वर गजबजून गेला आहे.
भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी तीन मजली दर्शन रांगेची व्यसस्था करण्यात आलेली आहे. यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ४३२ पोलीस कर्मचारी चोख बंदोबस्त बजावणार आहेत. मंदिर परिसरात व समुद्र किनारी सुरक्षिततेच्या दृष्टीने ठिकठिकाणी टॉवर उभे करण्यात आले आहेत. एस.टी. प्रशासन पूर्णपणे सज्ज असून पहाटेपासूनच सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. एस. टी. सर्वसोयींनी युक्त दोन वाहनतळ तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये वेळापत्रक, तात्पुरत्या शेड, शौचालये आदींची सोय केलेली आहे. त्याचप्रमाणे फिरत्या दुरूस्ती पथकांचीही सोय केलेली आहे.
यावेळी आपत्ती निवारणासाठी प्रथमच हॅम रेडीओ प्रणाली ही योजना राबविण्यात आली आहे. एखादी आपत्ती कोसळल्यावर संपर्क यंत्रणा बंद पडते. अशा स्थितीत मार्ग काढण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ही योजना यात्रोत्सव काळात राबविली जाणार आहे. आग, चेंगराचेंगरी, सिलींडर स्फोट, शॉर्टसर्कीट आदी आपत्ती ओढविल्यास उपाययोजना देण्यात ही यंत्रणा काम करणार आहे. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली दोन परीपूर्ण खास पथकांची स्थापना करण्यात येणार आहे.
यात्रा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहनतळ व कुणकेश्वरला येणाऱ्या वेगवेगळ्या मार्गावर वाहतूक पोलीस कार्यरत असणार आहेत. त्याचप्रमाणे संशयीत व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना सूचना करण्याचे आदेश पोलीस अधिक्षकांनी ग्रामस्थांना दिले आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रा परिसरात ठिकठिकाणी मार्गदर्शक फलकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रशासनाबरोबर स्थानिक स्वयंसेवकही कार्यरत असणार आहेत. भाविकांनी शांतता व शिस्त पाळावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन देवस्थान कमिटीने केले आहे. (वार्ताहर)

भाविकांची चोख व्यवस्था
श्रींच्या पूजनाला १२ वाजता आरंभ होणार असून विधिवत पूजन झाल्यानंतर रात्री १२ वाजता भाविकांसाठी दर्शनरांग खुल्या करण्यात येणार आहे. रांगेमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्यास भाविकांना मुखदर्शन देण्यात येईल. यात्राकाळात वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची काळजी संबंधित विभागाने घेतली आहे.

Web Title: A meeting of Shiva Bhavakars held in Kukeshwar today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.