मेगा फुडपार्क घोषणाच : परशुराम उपरकर, पालकमंत्र्यांसह, राजन तेलींवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:23 PM2018-05-18T13:23:21+5:302018-05-18T13:23:21+5:30
कास येथे सात एकर जागेत केसरकरांनी जाहीर केलेली मेगा फूड पार्क ही केवळ घोषणाच आहे. याबाबत केसरकरांनासुद्धा माहिती नाही, असा गौप्यस्फोट मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले राजन तेली कबुलायतदार गावकर प्रश्न सोडविण्याच्या वल्गना करीत आहेत. गेली पंधरा वर्षे राणेंसोबत सत्तेत असताना त्यांना कुणी अडविले होते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
सावंतवाडी : कास येथे सात एकर जागेत केसरकरांनी जाहीर केलेली मेगा फूड पार्क ही केवळ घोषणाच आहे. याबाबत केसरकरांनासुद्धा माहिती नाही, असा गौप्यस्फोट मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले राजन तेली कबुलायतदार गावकर प्रश्न सोडविण्याच्या वल्गना करीत आहेत. गेली पंधरा वर्षे राणेंसोबत सत्तेत असताना त्यांना कुणी अडविले होते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवस जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. याबाबतची माहिती देण्यासाठी उपरकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषद घेतली.
यावेळी ते म्हणाले, २१ ते २३ मे या कालावधीत राज ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी २२ रोजी ते कुडाळ येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. तर या तीन दिवसांच्या दौऱ्यात सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ, कणकवली, वैभववाडी याठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
उपरकर पुढे म्हणाले, केसरकर हे फक्त सावंतवाडीचे पालकमंत्री आहेत. सिंधुदुर्गच्या पोलीस खात्यात अनेक गोष्टी चुकीच्या घडत आहेत. मात्र त्यांच्यावर वचक ठेवण्याची कुवत केसरकर यांच्यात नाही.