सदस्य, अभियंत्यांत बाचाबाची
By admin | Published: June 25, 2015 11:30 PM2015-06-25T23:30:11+5:302015-06-25T23:30:11+5:30
बांधकाम समिती सभेत खडाजंगी : ‘पेयजल’ बिलासाठी ठेकेदाराकडे एक लाखाची मागणी
सिंधुदुर्गनगरी : देवगड तालुक्यातील गोवळ सोमलेवाडी येथील पेयजल योजनेअंतर्गत कामाची बिले काढण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा शाखा अभियंत्याने ठेकेदाराकडे चक्क एक लाख रूपयाची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप सदस्य विष्णु घाडी यांनी केला. या विधानाबद्दल सदस्य व संबंधित शाखा अभियंत्यांमध्ये खडाजंगी झाली. केलेले आरोप सिद्ध करा. मी नोकरीचा राजीनामा देईन असे आव्हान अभियंत्याने केल्याने सभागृहात जोरदार बाचाबाची झाली. मात्र, सभापती संजय बोबडी यांनी अखेर या विषयाची दखल घेत सभागृहात बोलताना भान ठेवा, चुकीचा शब्दप्रयोग करून सभागृह बदनाम करू नका असे खडेबोल सुनावत विष्णू घाडी यांना अखेर गप्प केले.
जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती संजय बोबडी यांच्या अध्यक्षतेखाली येथील डॉ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी सदस्य भगवान फाटक, आत्माराम पालयेकर, पंढरीनाथ राऊळ, रूक्मिणी कांदळगावकर, विष्णू घाडी, सदाशिव ओगले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
पैसे देणाऱ्या ठेकेदाराच्या कामाचे अंदाजपत्रक वाढविले जाते तर पैसे न देणाऱ्याचे अंदाजपत्रक कमी करण्याची धमकी दिली जाते. अशाच प्रकारे गोवळ सोमलेवाडी येथील कामाचे बिल देण्यासाठी पाणीपुरवठा शाखा अभियंत्याने १ लाखांची मागणी केल्याचा आरोप केला.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१५ - २०१६ साठी जिल्ह्याला ९ कोटी ४५ लाख निधी खर्चाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी गेल्या दीड महिन्यांत ३ कोटी २४ लाख निधी खर्चाची कामे करण्यात आली असून आतापर्यंत ८६ हजार मनुष्य दिन कामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
सभागृहाला बदनाम करू नका
लाखाच्या विषयावरून सभागृहात खडाजंगी होताच संतापलेल्या सभापती बोबडी यांनी सदस्य विष्णू घाडी यांना तुम्ही सभागृहाचे भान ठेवून बोला, चुकीचा शब्दप्रयोग करून सभागृहाला बदनाम करू नका असे खडेबोल सुनावले तर माजी सभापती भगवान फाटक यांनीही सदस्य घाडी यांनी सभागृहाला शोभणारे शब्द वापरा असे सांगितले. यावर घाडी यांनी काय चुकीचे बोललो सांगा, चुकीचे असेल तर सभागृहाची माफी मागतो असेही सांगितले.
बांधकाम विभागावर हल्लाबोल
बांधकाम विभागावरही ठेकेदारांकडून पैसे घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पैसे घेतल्याची फाईल पुढे सरकत नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
चार भिंतीत प्रकरण मिटविले
१ लाखांच्या मागणीसंदर्भात संबंधित अभियंत्याला सभागृहात जाब विचारला. यावेळी अभियंत्याने हा आरोप फेटाळत संबंधित काम निकृष्ट होत असेल तर बिले कशी काढणार? मी कोणत्याही ठेकेदाराकडे पैशाची मागणी केलेली नाही. निकृष्ट कामाचे बिल न दिल्याने बिनबुडाचे आरोप माझ्यावर केले जात आहेत. हे आरोप मी सहन करणार नाही. आपण केलेले आरोप सिद्ध कराल तर मी राजीनामा देईन असे सांगत माझी नाहक बदनामी करणाऱ्या संबंधित ठेकेदाराविरोधात फौजदारी दाखल करेन असेही सांगितले. त्यामुळे हा विषय सभागृहात बोलणे योग्य नाही. आपण हा विषय माझ्या चेंबरमध्ये सोडवू असे सभापती संजय बोबडी यांनी सांगत वादावर पडदा टाकला.