पक्षीविषयक आठवणीत ‘त्यां’चा मुक्त संचार
By admin | Published: November 16, 2015 09:39 PM2015-11-16T21:39:13+5:302015-11-17T00:01:43+5:30
सालीम अली जयंती : पर्यटन मित्रांकडून आगळीवेगळी आदरांजली
चिपळूण : कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळुणात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आद्यपक्षी शात्रज्ञ आणि पर्यावरणवादी डॉ. सालीम अली यांच्या १२०व्या जयंतीचे निमित्त साधून परिसरातील पक्षीप्रेमींनी आपल्या पक्षीविषयक आठवणी शब्दबद्द करीत आगळावेगळा पक्षीदिन रविवारी पेढे येथील श्री परशुराम निसर्ग पर्यटन केंद्रात साजरा केला.
पर्यटनमित्र समीर कोवळे, धीरज वाटेकर, निसर्गमित्र विलास महाडिक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सतीश कदम, सरपंच दीपक मोरे उपस्थित होते. यावेळी ओरायन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सचे कार्यकारी संचालक धीरज वाटेकर यांनी कै. डॉ. सालीम अली यांच्या कार्याविषयी माहिती दिली.
डॉ. सालीम अली यांनी पक्षी निरीक्षणाचा छंद कसा जोपासला व त्यातून ते करिअरकडे कसे वळले, याचा उलगडा त्यांनी केला. प्रास्ताविकातून समीर कोवळे यांनी अशा प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता प्रतिपादित केली. आगामी काळात लोकसहभागातून निसर्ग संवर्धनाचे उपक्रम कृतीत उतरवून संरक्षणास हातभार लावण्याचे आवाहन केले. यावेळी गारवा आग्रो टुरिझमचे सचिन कारेकर, अॅक्टिव ग्रुपचे कैसर देसाई, नेचर अॅण्ड एन्वायरनमेंट सोसायटी आॅफ ठाणे (नेस्ट) चे किशोर मानकर, छोटा पक्षीमित्र अथर्व रहाटे, वनविभागाचे बारसिंग साहेब, नाविद मोमीन यांनी आपले पक्षीसंवर्धनविषयक अनुभव आणि आठवणी सांगितल्या.
पक्षी ओळखणे, पक्ष्यांचा अधिवास , सवयी, आकाराची तुलना, स्थलांतर, घरटी, पक्ष्यांचे आयुष्य या अनुषंगाने उपस्थितांनी अनुभव कथन केले. सतीश कदम यांनी अशा उपक्रमांची आवश्यकता प्रतिपादित करत येत्या २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता चिपळुणातील महेंद्रगिरी पर्वतात होणाऱ्या कोकणातील पहिल्या बिगरमोसमी पश्चिम घाट जंगलपेर अभियानाबाबत माहिती दिली.
पेढे गावचे सरपंच दीपक मोरे यांनी यावेळी बोलताना निसर्गविषयक जाणीव जागृत करू पाहणाऱ्या सर्व उपक्रमांना गावचे नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. धीरज वाटेकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
पर्यटन केंद्रातील निसर्ग सान्निध्यात पक्षी निरीक्षण करणाऱ्या सर्व पक्षी प्रेमींना यावेळी विविध पक्षांची माहिती देण्यात आली. यावेळी दयाळ,लालबुड्या बुलबुल, कॉमन प्रिमिया, कॉमन किंगफिशर, ब्लॅक बर्ड, जंगल बाबलर, मलबार पाईड हॉर्नबील, नाचण, कोतवाल, चिरक, तांबट, टकाचोर,फुलटोचा, भारद्वाज, शिंजिर, हळद्या, इत्यादि पक्षांचे दर्शन झाले.