वीरांच्या स्मृतींनी आप्त हेलावले

By admin | Published: September 23, 2015 09:47 PM2015-09-23T21:47:48+5:302015-09-24T00:12:59+5:30

रत्नागिरी : भारत - पाक युद्धातील विजयाचा सुवर्ण महोत्सव

The memories of the heroes moved among themselves | वीरांच्या स्मृतींनी आप्त हेलावले

वीरांच्या स्मृतींनी आप्त हेलावले

Next

शोभना कांबळे - रत्नागिरी --१९६५ साली झालेल्या भारत - पाकिस्तान युद्धातील विजयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाने शहीद झालेल्यांच्या पराक्रमाच्या स्मृती जाग्या झाल्या अन् या स्मृतीनी त्यांच्या आप्तांना हेलावून टाकले. या कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना या साऱ्यांना अश्रू लपवता आले नाहीत.
पाच महिने भारताचे पाकशी युद्ध सुरू होते. भारतीय सैनिकांनी जिवाची बाजी लावत, रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पाकिस्तानला पळवून लावले व विजय मिळविला. मात्र, यात अनेक भारतीय सैनिकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. यात रत्नागिरी जिल्ह्यातील १५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका सैनिकाचा समावेश होता.
या युद्धात अखेर विजय मिळालाच. यापैकी काही तर २०-२२व्या वर्षीच सैन्यात दाखल झाले होते. काही देशसेवेने भारलेले असल्याने आपल्या नववधूला, चार - सहा महिन्यांच्या चिमुकल्याला मागे टाकून युद्धासाठी गेले ते परत न येता मातृभूमीच्या कुशीतच कायमचे विसावले होते.
या विजयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमिताने राज्याचा सैनिक कल्याण विभाग, तसेच माजी सैनिक संघटना, रत्नागिरी व सिंंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या युद्धात तसेच इतर युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींचा तसेच शौर्यपदक मिळालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील २८ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ अशा एकूण ५१ जणांचा यावेळी गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान १९६५ सालीच्या युद्धाची चित्रफीत दाखवण्यात आली होती. त्यामुळे या साऱ्यांना या युद्धभूमी दिसली होती. त्यामुळे आपला वीरसैनिक कसा लढला असेल, याची त्यांना कल्पना आली. त्यामुळे वीर माता - पिता, पत्नी यांचा सत्कार होताना त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. आपल्या पती किंवा पुत्राला गमावल्याचे दु:ख एवढी वर्षे सहन करीत असतानाच मातृभूमीसाठी त्याने आपले प्राण अर्पण केले आणि त्याच्या पराक्रमाबद्दलची कृतज्ञता याबद्दल आज आपला गौरव होतोय, याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.


1१९६२, १९६५ आणि १९७१ अशा तीनही युद्धात सहभागी झालेल्या पांडुरंग राघो जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
2रत्नागिरीतील गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या मुलांनी ध्वजनिधीतून १० हजार रूपयांचा निधी सैनिकांच्या कल्याणासाठी मिळवून दिला आहे.
3कर्नल नाईक यांनी माजी सैनिकांच्या अवलंबितांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमासाठी शाळांमधील मुले स्वयंसेवक होते. सत्कारमूर्तीचे नाव पुकारताच या वयोवृद्ध असलेल्या वीरमाता, वीरपत्नी यांच्याजवळ येऊन व्यासपीठावर घेऊन जाण्याचे काम ही मुले करीत होती. परत त्यांना जाग्यावर आणून बसविताना अनेक माता या मुलांच्या गालावरून मायेचा हात फिरवायला विसरल्या नाहीत.

कार्यक्रमाचा प्रारंभ रत्नागिरीतील गायिका अंजली लिमये यांच्या प्रसिद्ध कवी प्रदीप यांचे गानकोकिळा लता मंगेशकर यांनी अजरामर केलेल्या ‘ए मेरे वतने के लोगो’ या गाण्याने झाला. त्यामुळे सैनिकांच्या नातेवाईकांबरोबरच उपस्थित नागरिकांनाही गहिवरून आले. पुन्हा सत्कारादरम्यान लिमये यांनी ग. दि. माडगुळकर यांच्या ‘भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी’ या प्रसिद्ध रचनेने त्यांना आदरांजली अर्पण केली. या गाण्याने साऱ्यांनाच पुन्हा हेलावून टाकले. यावेळी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह पूर्णत: भारावून गेले होते.

Web Title: The memories of the heroes moved among themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.