जिल्ह्यातील गणरायांना निरोप

By admin | Published: September 16, 2016 11:38 PM2016-09-16T23:38:40+5:302016-09-16T23:42:33+5:30

अनंत चतुर्दशी : १८ हजार गणेशमूर्तींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन; पावसाच्या हजेरीने भक्त चिंब

Message to the people of the district | जिल्ह्यातील गणरायांना निरोप

जिल्ह्यातील गणरायांना निरोप

Next

कणकवली : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला' च्या जयघोषात जिल्ह्यातील १८ हजार ३७९ घरगुती, तर २१ सार्वजनिक गणेशमूर्तींचे गुरुवारी अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन करण्यात आले. यामध्ये कणकवलीचे भूषण असलेल्या टेंबवाडी येथील ‘संतांच्या गणपती’ चा समावेश होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अनेक भागात पावसानेही जोरदार हजेरी लावत गणेश भक्तांना चिंब भिजवले.
सिंधुदुर्गात यावर्षी ६६ हजार ५४५ घरगुती, तर ३७ सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यापैकी दीड दिवसांनी सार्वजनिक एक, तर १४ हजार १४४ घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते. पाचव्या दिवशी १७ हजार १६४ घरगुती गणपती, सहाव्या दिवशी गौरीसह १ हजार ९८, सातव्या दिवशी सार्वजनिक ६, तर घरगुती १० हजार १८३, नवव्या दिवशी ३ हजार ५६४, तर अकराव्या दिवशी २१ सार्वजनिक आणि १८ हजार ३७९ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
गेले अकरा दिवस आरती आणि भजनांमुळे वातावरण भक्तिमय बनले होते. बालगोपाळांचा उत्साह ओसंडून वाहत होता. गणपती बाप्पांच्या आराधनेत भक्तमंडळी तल्लीन झाल्याचे चित्र होते. बाप्पांसाठी उकडीचे मोदक आणि करंज्यांचा नैवेद्य दाखवित, सुखकर्ताङ्घदु:खहर्ताचे सूर आळवित गणेशभक्तांनी आपले त्याच्याशी असलेले नाते अधिकच घट्ट केले. निरोपाचा दिवस उजाडला, तशी पुन्हा एकदा लगबग सुरू झाली. आरतीच्या सुरांनी पुन्हा एकदा बाप्पांची आळवणी करण्यात आली. सायंकाळ झाली, तोपर्यंत निरोपाचा क्षण जवळ आला, या जाणीवेने बच्चेकंपनीची घालमेल सुरू झाली. त्यातच बच्चे कंपनीचा ‘पुढच्या वर्षी लवकर या..’ चा जयघोष सुरू झाला.
नदी, नाले, समुद्र्रकिनारे, तलाव आदी विसर्जनस्थळी गणरायाला अखेरचा निरोप देण्यासाठी असंख्य हात जोडले गेले. फटाके आणि ढोलताशांचे आवाज आसमंतात घुमत होते. मात्र, दुसरीकडे बाप्पाप्रती असलेल्या भक्तीभावनेचा मनातला एक कोपरा हळवा झाला होता.
कणकवलीतील जानवली नदीवरील गणपती सान्यावर टेंबवाडी येथील संतांच्या गणपतीला निरोप देण्यात आला. पारंपारिक पध्दतीने लाकडी मंचकावर विराजमान झालेल्या या गणरायाला मोठ्या भक्तिभावाने विसर्जन स्थळापर्यंत नेण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत बच्चे कंपनीसह महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
कणकवली नगरपंचायतीच्यावतीने भालचंद्र महाराज आश्रमाजवळील भक्त निवासाकडे गणरायावर पुष्पवृष्टीकरण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा माधुरी गायकवाड़, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते. कणकवलीत पोलिस निरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर आपत्कालीन पथकही कार्यरत
होते. (प्रतिनिधी)


जल्लोषात मिरवणूका : प्रशासनाचे चोख नियोजन
कणकवली शहरासह जिल्ह्यात समुद्र, नदी, तलाव, ओढे अशा पारंपरिक ठिकाणी,गणपती सान्यावर गणरायाला निरोप देण्यात आला . कुडाळ येथील सिंधुदुर्गच्या राजाचेही जल्लोषी मिरवणुकीने सायंकाळी ४ वाजता विसर्जन करण्यात आले.
गणेश विसर्जनाच्या निमित्त जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरवणुकीमुळे शहरांमध्ये वारंवार होणारी वाहतूक कोंडीची समस्या देखील पोलिस जातीनिशी सोडवित होते. तर स्थानिक नगर पालिकांनीही विशेष नियोजन केले होते.


भाविकांचा जयघोष
अकरा दिवस मोदकांचा नैवेद्य आणि आरती-भजनांच्या सुरावटीसह मनोभावे पूजन केलेल्या गणरायाला गुरुवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात असंख्य भाविकांनी ‘डोळ्यांनी पाहीन रुप तुझे..’चे सूर आळवित ‘पुढच्या वर्षी लवकर या...’ची हाक दिली.

Web Title: Message to the people of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.