मुख्यवनसंरक्षकासह उपवनसंरक्षकाना मॅटचा दणका, वनविभागात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 10:22 PM2018-01-19T22:22:05+5:302018-01-19T22:22:31+5:30
कणकवली वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी विनायक सावंत यांच्या निलंबनाबाबत योग्य तो निर्णय घ्या, असा आदेश ‘मॅट’ने देऊनही त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याने मॅट प्राधिकारणाने कोल्हापूर वनपरिक्षेत्राचे मुख्यवनसंरक्षक अरविंद पाटील यांच्यासह सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला आहे.
सावंतवाडी : कणकवली वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी विनायक सावंत यांच्या निलंबनाबाबत योग्य तो निर्णय घ्या, असा आदेश ‘मॅट’ने देऊनही त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याने मॅट प्राधिकारणाने कोल्हापूर वनपरिक्षेत्राचे मुख्यवनसंरक्षक अरविंद पाटील यांच्यासह सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. हा दंड स्वत:च्या खिशातून भरला जावा, असे आदेश ६ जानेवारीला बजावण्यात आले आहेत.
कणकवली वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी विनायक सावंत यांच्यावरे वैभववाडी येथील मालकी क्षेत्रात अवैधरित्या वृक्षतोड केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई एक वर्षापूर्वी झाली होती. मात्र नंतर सावंत हे सेवानिवृत्त झाले होते. त्याच काळात त्यांनी वन न्याय प्राधिकरण म्हणजेच मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅटने या सर्व प्रकरणावर माहिती घेतली तसेच तक्रारदार विनायक सावंत यांच्यासह वनविभागची बाजू ऐकून घेतली आणि आपला निर्णय जाहीर केला.
हा निर्णय देत असताना २५ मार्च २०१७ ला विभागीय चौकशी पूर्ण झाली असून, त्यांच्या निलंबनाबाबत वनविभागाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी सूचना वनविभागाला केली होती. पण अद्यापपर्यंत कोणताही निर्णय मॅट आदेशानंतरही घेण्यात आला नाही. याच काळात सावंत हे सेवानिवृत्त झाले होते. त्यांना सेवानिवृत्तीचे कोणतेही लाभ मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पुन्हा मॅटकडे धाव घेतली होती. त्यावरून मॅटने वनविभागाला विचारणा केली होती.
यावर मागील सुनावणीवेळी सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी मॅटकडे निलंबनाचा कालावधी हा निलंबन म्हणून धरण्यात यावा, असे चुकीचे उत्तर दिले. यावरून मॅटने याच विधानाला हरकत घेत ६ जानेवारी २०१८ ला कोल्हापूर वनपरिक्षेत्राचे मुख्यवनसंरक्षक अरविंद पाटील यांच्यासह सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण या दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. हा दंड तत्काळ भरण्यात यावा तसेच सरकारी खर्चातून हा दंड न भरता स्वत:च्या खिशातून भरावा, असे आदेशही देण्यात आले आहेत.
मॅटने दिलेल्या आदेशाने वनविभागात एकच खळबळ माजली असून, हा वनविभागात घडलेला पहिलाच प्रकार आहे. पुढील सुनावणी वेळी मॅटने मुख्यवनसंरक्षकासह सिंधुदुर्गच्या उपवनसंरक्षकाना हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत.