बुरोंडीत मध्यरात्री घुसले समुद्राचे पाणी

By admin | Published: August 31, 2014 10:59 PM2014-08-31T22:59:13+5:302014-08-31T23:47:42+5:30

मच्छिमारांची उडाली धावपळ : वाहून जाणाऱ्या होड्या वाचविण्यात मच्छिमारांना यश

Midnight intruding sea water | बुरोंडीत मध्यरात्री घुसले समुद्राचे पाणी

बुरोंडीत मध्यरात्री घुसले समुद्राचे पाणी

Next

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अचानक समुद्राचे पाणी घुसल्याने येथील मच्छिमारांची धावपळ उडाली होती. अनेक होड्या वाहून जाऊ लागल्याने रात्रीच्या अंधारातही मच्छिमारांनी मोठ्या हिमतीने त्या वाचवण्यात यश मिळविले.
आठवडाभर जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला होता. ही झाडे रस्त्यातून दूर केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली आहे.
गेल्या दोन दिवसांत पावसासह वाऱ्यांचा वेगही वाढला आहे. वादळी वाऱ्याने समुद्र खवळल्याने समुद्रात जाणे धोकादायक स्थिती निर्माण झाल्याने मच्छिमारांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे बहुतांश मासेमारी नौका किनारी नांगरावर आहेत.
जल्हा प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिल्याने बुरोंडीतील मच्छिमार समुद्रात न जाता त्यांनी नौका किनाऱ्यावरच नांगरल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून अनेक नौका तेथे नांगरावरच होत्या. शनिवारी रात्री बुरोंडीतील मच्छिमार गाढ झोपी गेले होते.
मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास समुद्राच्या पाण्याची पातळी अचानक वाढून पाण्याचा लोंढा किनाऱ्यावर आदळला. किनाऱ्यावरील नौका वाहून जाऊ लागल्याने किनारीपट्टीवरील ग्रामस्थांना जाग आली. ओरडा सुरू झाल्याने सारेच किनाऱ्यावर आले.
संपूर्ण गाव जागे झाल्याने ग्रामस्थांची धावपळ उडाली होती. अंधाराची तमा न बाळगता अनेकांनी होड्या वाचवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या. त्यामध्ये तिघे जण पाण्यात वाहून जाऊ लागल्याने एकच आरडाओरड सुरु झाली. त्याच वेळी काही मच्छिमारांनी दोर पाण्यात टाकले. त्या दोरांना पकडून वाहात चाललेले मच्छिमार कसेबसे किनारी आल्याने त्यांचा जीव वाचला. त्यात वाहून जात असलेल्या होड्या शर्थीने प्रयत्न करुन वाचवण्यात येत आहे.
रात्रीचा अंधार त्यातच कोसळणारा धो-धो पाऊस त्यामुळे बुरोंडीमध्ये गोंधळ उडाला होता. मात्र, सुदैवाने प्राणहानी न झाल्याने मच्छिमारांनी सुटकेचा श्वास घेतला. बुरोंडीत प्रथमच अशा प्रकारच्या सागरी आक्रमणाने मच्छिमार हादरुन गेले आहेत. (शहर वार्ताहर)

Web Title: Midnight intruding sea water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.