सैनिक भरती संपली, शहर स्वच्छता मोहीम कधी?
By admin | Published: February 20, 2015 10:32 PM2015-02-20T22:32:32+5:302015-02-20T23:11:02+5:30
रत्नागिरी नगर परिषद : मारुती मंदिर परिसरात अजूनही घाणीचे साम्राज्य
रत्नागिरी : शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर गेल्या आठवड्यात झालेल्या सैनिक भरती प्रक्रियेतील त्रुटी उघड झाल्यानंतर आता मारुती मंदिर परिसर स्वच्छतेची समस्या समोर आली आहे. त्यामुळे या भागातील स्वच्छतेसाठी रत्नागिरी नगरपरिषद आता स्वच्छता मोहीम कधी हाती घेणार, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.
रत्नागिरीत ८ ते १८ फेबु्रवारी २०१५ या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच गोवा, गुजरात व उर्वरित महाराष्ट्रासाठी सैनिक भरतीचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवसापासूनच या भरती आयोजनात अनंत अडचणी, त्रुटी उघड झाल्या. त्यामुळे भरतीसाठी आलेल्या तरुणांना अनेक गैरसोर्इंना सामोरे जावे लागले. केवळ ८ स्वच्छतागृहांमुळे तर दररोज येणाऱ्या हजारोे तरुणांची प्रचंड गैरसोय झाली.
निवासाची सोय नव्हती की भोजन, नाश्त्याची व्यवस्था शासकीय पातळीवर करण्यात आली नाही. हॉटेल व्यावसायिकांना विश्वासात घेऊन किती तरुण या भरतीत सहभागी होणार, याची साधी कल्पनाही देण्यात आली नाही. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांत तर सायंकाळी ५ वाजल्यानंतर जेवण नाहीच पण साधा वडापावही या तरुणांना उपलब्ध झाला नाही. त्यानंतरच्या दिवसात काही स्वयंसेवी संस्थांनी मोफत भोजन, नाश्त्याची व्यवस्था केली. निवास व्यवस्था नसल्याने वर्तमानपत्राचा कागद मारुती मंदिर सर्कल, परिसरातील मोकळी जागा, हिंदू कॉलनीतील काही लोकांच्या कुंपणात जमिनीवर टाकून झोपण्याची वेळ या तरुणांवर आली. स्वच्छतागृहेदेखील उपलब्ध नसल्याने आजूबाजूच्या परिसराचाच वापर स्वच्छतागृहांसारखा झाला आहे.
त्यामुळे गेल्या दहा दिवसांच्या महासैन्यभरतीच्या काळात या परिसराला अत्यंत बकाल स्वरुप आले आहे. त्याच्या खुणा मारूती मंदिर, हिंदू कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरात आजही दिसून येत आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने या सर्व भागांमध्ये लवकरात लवकर खास स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी आता शहरवासियांतून होत आहे. अशाप्रकारचे मोठे कार्यक्रम घेताना त्याचे योग्य नियोजन नसेल, तर शहर परिसरातील क्रीडांगणे अशा मोठ्या कार्यक्रमांसाठी दिली जाऊ नयेत, अशा सूचनाही नागरिकांतून केल्या जात आहेत. (प्रतिनिधी)