कोट्यवधीच्या कोकेनचा लाखात सौदा
By admin | Published: June 1, 2014 12:48 AM2014-06-01T00:48:52+5:302014-06-01T00:52:43+5:30
सिंधुदुर्गमधील युवकाकडे मिळाला साठा कारवाई झाली नसल्याचा गोवा पोलिसांचा दावा
सावंतवाडी/बांदा : गोवा अॅन्टी नॉर्कोटिक्स विभागाच्या अधिकार्यांनी कळंगुट मार्केटमध्ये एका कारमध्ये धाड टाकून सिंधुदुर्गमधील युवकाकडून तब्बल दोन किलो कोकेन जप्त केले आहे. या कोकेनची बाजार भावाप्रमाणे किंमत तब्बल कोटीच्या घरात आहे. मात्र, गोवा अॅन्टी नॉर्कोटिक्स विभागाने याबाबत कानावर हात ठेवले आहेत. अशी कोणतीच कारवाई झाली नसल्याचे ते सांगत आहेत. मात्र, प्राप्त माहितीनुसार कोट्यवधीच्या कोकेनचा लाखात सौदा झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने गोवा अॅन्टी नॉर्कोटिक्स विभागाचे पोलीस अधिकारी तसेच कळंगुट पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती अशी की, सिंधुदुर्गच्या सीमेवरील एका गावातील युवक कळंगुट येथे हॉटेल व्यवसाय करीत आहे. या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक येतात. त्यांना अंमली पदार्थाचा हव्यास असतो. त्यासाठी सिंधुदुर्गमधील युवक शनिवारी दुपारी कोेकेनचा साठा घेऊन हॉटेलकडे चालला होता. या युवकाची कार कळंगुट मार्केटमध्ये आली असता गोव्याच्या अॅन्टी नॉर्कोटिक्स विभागाने या कारची तपासणी केली असता कारमधील पिशवीत तब्बल दोन किलोच्या आसपास कोकेनचा साठा आढळला. या कोकेनची किंमत बाजार भावाप्रमाणे दोन कोटीच्या घरात आहे. हा युवक हॉटेलच्या माध्यमातून गोव्यातील पोलिसांवर राज करीत असून त्याचे काही गुरूही गोव्यात या व्यवसायात आहेत. घटनेनंतर त्यांनी ताबडतोब दूरध्वनीवरून आपल्या गुरुंना संपर्क साधून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. शनिवारी दुपारी हे वृत्त सिंधुदुर्गमध्ये वार्यासारखे पसरले. त्यावरून गोवा पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनी आम्हाला माहिती नाही, असा पवित्रा घेतला आहे. मात्र, कळंगुट मार्केटमध्ये शनिवारी १२ वाजता ही कारवाई करण्यात आली. तेव्हा तेथे काही जिल्ह्यातील पर्यटक हजर होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कोट्यवधीच्या कोकेनचा काही लाखात सौदा झाला असून त्यानंतर हे प्रकरण दडपण्यात आले आहे. यापूर्वी सिंधुदुर्गमधील युवकांना ड्रग्जचा सप्लाय करीत असताना बेंगलोर पोलिसांनी निपाणीजवळ पकडले होते. तर सावंतवाडीतील कुणकेरी येथील युवकांना आजरानजीक कोल्हापूर पोलिसांनी पकडले होते. हरमल येथील युवकांना सावंतवाडी पोलिसांनी निरवडेनजीक पकडले होते. सिंधुदुर्गमध्ये गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात युवक अंमली पदार्थाच्या आहारी गेले आहेत. स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हे प्रकार वाढीस लागले आहेत. गोव्यात शनिवारी ज्या युवकावर कारवाई केली, त्या युवकाचा सावंतवाडी परिसरातच वावर मोठ्या प्रमाणात आहे. या कारवाईच्या चर्चेनंतर कळंगुट पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता कोणत्याही व्यक्तीकडे असा साठा मिळाला नाही, असे सांगितले. तर गोवा अॅन्टी नॉर्कोटिक्स विभागाचे पोलीस निरीक्षक सुरज हळणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)