नेमळेत बागेस आग लागून लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 02:46 PM2021-05-12T14:46:34+5:302021-05-12T14:49:09+5:30
Mango Fire Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यातील नेमळे-देऊळवाडी येथील मनोहर शांताराम परब यांच्या आंबा कलमाच्या बागेस मंगळवारी अचानक आग लागल्याने लाखोंची हानी झाली आहे. आंबा कलमांसोबतच या आगीत वीस काजू कलमे, बांबूची चार बेटेही होरपळून गेली. त्याचबरोबर २० हजार किमतीची गवताची गंजी, १५ हजार किमतीचे भातमळणी यंत्र जळून खाक झाले. त्यामुळे परब यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
तळवडे/सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील नेमळे-देऊळवाडी येथील मनोहर शांताराम परब यांच्या आंबा कलमाच्या बागेस मंगळवारी अचानक आग लागल्याने लाखोंची हानी झाली आहे. आंबा कलमांसोबतच या आगीत वीस काजू कलमे, बांबूची चार बेटेही होरपळून गेली. त्याचबरोबर २० हजार किमतीची गवताची गंजी, १५ हजार किमतीचे भातमळणी यंत्र जळून खाक झाले. त्यामुळे परब यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
आंबा हंगामाच्या काळात लागलेल्या या आगीत परब यांची आंबे लागलेली १५ आंबा कलमे भस्मसात झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच नेमळेचे तलाठी अरुण पाटोळे, लिपिक सुनील राऊळ, बाबू परब यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच कृषी विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाला कळवून पंचयादी तयार करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, उशिरापर्यंत कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते.
परब यांच्या या बागायतीलगत रेल्वेचा ट्रॅक असल्यामुळे रेल्वेतील प्रवाशांकडून टाकलेल्या विडी किंवा सिगारेटमुळेही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, या आगीत झालेल्या नुकसानीची लवकरात भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी मनोहर परब यांनी केली आहे.