कोनाळकट्टा येथील पोस्टात लाखोंचा घोटाळा !

By admin | Published: November 5, 2015 11:37 PM2015-11-05T23:37:26+5:302015-11-05T23:47:49+5:30

पोट मारून पै-पै ची बचत केली अन्...

Millions of scams in the post of Konalakata! | कोनाळकट्टा येथील पोस्टात लाखोंचा घोटाळा !

कोनाळकट्टा येथील पोस्टात लाखोंचा घोटाळा !

Next

साटेली भेडशी : दोडामार्ग तालुक्यातील कोनाळकट्टा येथील पोस्ट कार्यालयात खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कम गायब झाल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. कार्यालयातील पंधरा हजार खातेदार असून, ही रक्कम लाखो रुपयांवरून कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे. खात्रीशीर व रकमेची हमी असणाऱ्या पोस्ट कार्यालयातील खातेदारांची मुदत संपलेली रक्कम गायब झाल्याचे पाहून खातेदारांना अक्षरश: रडू कोसळले. दरम्यान, बुधवारी पोलिसांत तक्रार अर्र्ज दाखल केलेल्या खातेदारांनी येथे उपविभागीय डाकघर सहायक अधीक्षक इंगळे यांनी या खातेदारांना धीर देत आपली रक्कम परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले.
कोनाळकट्टा येथे द्वितीय क्रमांकाचे पोस्ट कार्यालय आहे. येथील बहुतांश भाग ग्रामीण असल्याने येथे खातेदारांची संख्याही मोठी नोंदविण्यात आली. या खातेदारांपैकीच एक असणारे तिलारी येथील ठेकेदार मुसा यांनी आठ दिवसांपूर्वी पोस्ट कार्यालयात येऊन आपल्या खात्यात असलेल्या दोन लाख रुपयांची मागणी केली. त्या दिवसांपासून येथे काम करणारे बांदेकर हे कर्मचारी गायब झाले. आपले पैसे मिळण्याबाबत पोस्टाकडून टाळाटाळ का होते? असा संशय आल्याने मुसा यांनी पोस्ट कार्यालयात जाऊन खात्याची तपासणी केली असता आपल्या खात्यावर रक्कमच शिल्लक नसल्याचे त्यांना कळले. त्याच वेळी पोस्ट कर्मचारी सुरेश बांदेकर गायब झाल्याने मुसा यांचा संशय बळावला. यामुळे परिसरात या प्रकरणाबाबत चर्चा सुरू झाली. त्यावेळी येथील पोस्ट कार्यालयातील खातेदारांनी तिलारी व दोडामार्ग येथील पोस्ट कार्यालयात जाऊन आपल्या खात्याची तपासणी केली. त्यावेळी खातेदारांना आपले पैसे कोणीतरी परस्पर काढल्याचे जाणवले. बुधवारी सायंकाळी १५ ते २० खातेदारांनी दोडामार्ग पोलिसांत दाखल होत पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी यांना लेखी निवेदन देऊन याची सखोल चौकशी करण्याची विनंती केली.
त्यानंतर गुरुवारी सकाळी तिलारी पोस्ट कार्यालयात शेकडो खातेदार जमा झाले. या पोस्ट कार्यालयात सुमारे १५,००० खातेदार असून, प्रत्येक खातेदाराचे पैसे परस्पर गायब झाल्याने ही रक्कम कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
सावंतवाडी उपविभाग डाकघर सहायक अधीक्षक इंगळे हे गुरुवारी सकाळी तिलारी पोस्ट कार्यालयात दाखल झाले. यावेळी खातेदारांनी इंगळे यांना घेराव घालत आपल्या ठेवी मिळण्यासाठी चांगलेच फैलावर घेतले. यापूर्वी २०१३ मध्ये मांगेली येथील पोस्ट कार्यालयात सुमारे सात लाखांचा गैरव्यवहार उघडकीस आला होता. यावेळी तेथील पोस्ट मास्तर विराज गवस याने आत्महत्याही केली होती. त्यानंतर पोस्ट खात्याने त्यांची रक्कम खातेदारांना परत करण्यात आली होती, अशी माहिती अर्जुन इंगळे यांनी दिली. (वार्ताहर)

अपहार झालेले खातेदार
तुकाराम रामचंद्र्र सावंत- ४ लाख, सीताराम भानू गवर- ४.५० लाख, शरद तुकाराम गावडे -तीन लाख, सखाराम महादेव गावडे- ४. ५० लाख, आमु्रड घाबरो लोबो- ३.२५ लाख, बाबतीस लॉरेन्स लोबो- तीन लाख, सुनील विश्वनाथ शेटये-५० हजार, लक्ष्मी अशोक गौडकर-२० हजार, आनंद काशीनाथ वरणेकर- २० हजार, गोपिका गोविंद गवस- पाच लाख, आनंद गोंविद मणेरीकर- सहा लाख, राजेंद्र यशवंत सावंत- १.५ लाख, अश्विनी रमाकांत गवस - ४० हजार, आदींनी प्राथमिक स्वरूपात आपली रक्कम गायब झाल्याची तक्रार पोलिसांसह इंगळे यांना कागदपत्रे सादर करून दिली आहे, तर बऱ्याच जणांना या पोस्ट कार्यालयामार्फत बनावट बचत खात्याची पासबुकेही देण्यात आली आहेत.

पोट मारून पै-पै ची बचत केली अन्...
कोनाळकट्टा हा परिसर तसा ग्रामीण भागात मोडणारा आहे. येथे बहुतांश ग्रामस्थांकडे येणारा पैसा हा मोलमजुरी व नोकरी करूनच येतो. पोस्ट कार्यालयात यातील ग्रामस्थांनी पोट मारून आपल्या कुटुंबांच्या भविष्यातील संकटांचा, अडीअडचणींचा सामना करण्यासाठी पै-पै रकमेची जमवाजमव केली होती; पण मुदतीनंतर ती गायब झाल्याचे कळताच या खातेदारांना भर रस्त्यावरच रडू कोसळले.

Web Title: Millions of scams in the post of Konalakata!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.