सावंतवाडीतील मिनी पोलिस चौकी हटवली, नगरपरिषदेची परवानगी नसल्याने कारवाई
By अनंत खं.जाधव | Published: March 18, 2023 12:43 PM2023-03-18T12:43:56+5:302023-03-18T12:44:23+5:30
माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते या मिनी पोलीस चौकीचे सकाळीच उद्घाटन झाले होते
सावंतवाडी : अल्पसंख्यांक भाजप सेलचे जिल्हाध्यक्ष रफिक शेख यांच्या माध्यमातून येथील नगरपरिषद समोर उभारण्यात आलेली मिनी पोलीस चौकी अखेर शुक्रवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. दरम्यान या मिनी पोलीस चौकीसाठी नगरपरिषदेची परवानगी नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे नगरपरिषदकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या मिनी पोलीस चौकीचे उद्घाटन सकाळीच माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते झाले होते. सावंतवाडी नगरपरिषद समोर निलेश राणे च्या वाढदिवसाचे औचित्य साधून रफिक शेख यांनी मिनी पोलीस चौकी उभारली होती.गेली अनेक वर्षं पोलीस उन्हात थांबतात त्यांना उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात सुरक्षिता असावी म्हणून ही पोलीस चौकी उभारण्यात आली होती.मात्र ही पोलीस चौकी नगरपरिषद च्या हद्दीत उभारून ही नगरपरिषद कडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती.
त्यातच या पोलीस चौकीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी काल, शुक्रवारी सकाळीच उद्घाटन केले होते. मात्र सायंकाळी नगरपरिषदेने परवानगी बाबत सर्व कागदपत्रांची छाननी केली पण कोणतीही परवानगी आढळून आली नाही.त्यानंतर मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी पोलीस बंदोबस्तात ही मिनी पोलीस चौकी हटविण्याचे आदेश दिले.
त्यानुसार नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून ही मिनी पोलीस चौकी हटविण्यात आली.याबाबत नगरपरिषद कर्मचारी मनोज राऊळ यांना विचारले असता पोलीस चौकी उभारण्या बाबत कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले.