मिनीमहाबळेश्वर पाणीटंचाईच्या खाईत

By Admin | Published: February 3, 2015 10:42 PM2015-02-03T22:42:50+5:302015-02-03T23:54:24+5:30

तहान भागेना : ५७ गावे, १२२ वाड्यांचा टंचाई आराखड्यात समावेश, नादुरुस्त योजनांबद्दल उपाययोजना नाही

Minimahabaleshwar water scarcity | मिनीमहाबळेश्वर पाणीटंचाईच्या खाईत

मिनीमहाबळेश्वर पाणीटंचाईच्या खाईत

googlenewsNext

शिवाजी गोरे - दापोली --कोकणात सर्वाधिक पाऊस पडूनसुद्धा योग्य नियोजन होत नसल्याने, पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. हिवाळा संपताच पाणी पातळी खालावते व जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच पाणीटंचाई जाणवायला लागते. कोकणच्या मिनीमहाबळेश्वरला सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली असून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दापोली तालुक्याचा पाणीटंचाई आराखडा तयार झाला आहे. ५७ गावे, १२२ वाड्यांचा पाणी टंचाई आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.
दापोली तालुक्यात टंचाई आराखड्याने उग्र रूप धारण केले असून ५७ गावे, १२२ वाड्यात फेब्रुवारीपासूनच टंचाईच्या आराखड्यावर येणार आहेत. तालुक्यातील खेर्डी-कातळवाडी, विसापूर-खातलोली, बौद्धवाडी, मांदिवली-बाईतवाडी, कवडोली-गावठाणवाडी, आतगाव-गावठाणवाडी, भाटवाडी, उटंबर-कोळीवाडा, चिंचवळ आघारी-तिवरे रहाटवाडी, ओणी-मधलीवचाडी, वरवटकरवाडी, वरवटकरवाडी नं.२, जामगे-देवाचा डोंगर, नवानगर, मुर्डी-चाचवलवाडी, तामसतीर्थ-भंडारवाडा-कोळीवाडा, करजगाव-मधलीवाडी, मुकादमवाडी, चिपळूणकरवाडी, भाटी-पूर्ववाडी, पश्चिमवाडी, भोईवाडा, उन्हवरे-गणेशवाडी, फरारे-मोगरेवाडी या ११ गावे १८ वाड्यांना टँकरवर तहान भागवावी लागत आहे. या गावांना उन्हाळ्यात दरवर्षी आपली तहान टँकरमधून मिळणाऱ्या चार हंडे पाण्यावर भागवावी लागत आहे. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
नळपाणी योजनेतील २१ गावे, ३१ वाड्यातील नळपाणी योजना नादुरुस्त असल्याने, टंचाई आराखड्यात त्यांचाही समावेश करण्यात आला आहे. दापोली तालुक्यातील देवाचा डोंगर जामगे, नवानगर, भाटी, उन्हवरे, फरारे-मोगरेवाडी, ओणी, माघारी, उटंबर, आतगाव, कवडोली या गावांना पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका बसत आहे. फरारे-मोगरे, भोईवाडी, ओणी-भाटी ही गाव समुद्र खाडीकिनारी असूनसुद्धा, या गावामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे.
टंचाई आराखडा दरवर्षी तयार केला जातो. मात्र, कायमस्वरूपी तोडगा सापडलेला नाही. काही गावांना टँकरवर अवलंबून राहवे लागते. दिवसाला चार हंडे पाण्यावर जीवन जगायचे कसे, असा प्रश्न आहे. देवाचा डोंगर, जामगेवाडीला पाणीटंचाईच्या काळात १० ते १४ किलोमीटर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. फरारे-मोगरे या गावाच्या पायथ्याशी समुद्र आहे. पाणीटंचाईने त्यांच्या घशाला कोरड पडली आहे. अनेक गावांना विंधन विहिरीवर अवलंबून राहवे लागत आहे.
दापोली तालुका निसर्गसंपन्न तालुका आहे. थंड हवेचे ठिकाण, कोकणचे ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून दापोलीची ओळख असली, तरी कोकणच्या ‘मिनी महाबळेश्वर’ची पाण्याची तहान प्रशासनाला भागवता आलेली नाही.
आजही पाण्यासारख्या मूलभूत गरजेकडे सरकार व प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, पाणीटंचाई आराखडा तयार असला तरी त्याची अंमलबजावणी शून्य आहे. शासनाच्या पाणीविषयक धोरणाची अंमलबजावणी अधिक पारदर्शकपणे व्हायला हवी, ही अपेक्षा गेली अनेकवर्षे तशीच राहिली आहे.

Web Title: Minimahabaleshwar water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.