बांद्यातून मायनिंगच्या अधिकाऱ्यांचा पोबारा
By admin | Published: November 29, 2015 01:08 AM2015-11-29T01:08:56+5:302015-11-29T01:08:56+5:30
गोव्यातून गुपचूप येत पाहणी : ग्रामस्थांकडून पाठलाग
बांदा : राज्य शासनाच्या भूविज्ञान आणि खनिकर्म संचलनालयाने जाहीर केलेल्या खनिज पट्ट्यातील प्रस्तावित बांदा व डेगवे गावांतील लोहखनिज लीजची पाहणी करण्यासाठी गोवा येथील मायनिंग कंपनीचे अधिकारी शनिवारी सकाळीच आलिशान कारमधून गुपचूप आले होते. स्थानिकांचा विरोध होण्याच्या शक्यतेने हा दौरा पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आला होता. मात्र, स्थानिकांना याची कुणकुण लागताच संबंधित अधिकाऱ्यांनी तेथून पोबारा केला.
या दौऱ्याबाबत महसूल विभागालादेखील अंधारात ठेवण्यात आले होते. खनिकर्म संचलनालयाने स्थानिकांना विश्वासात न घेता बांदा व डेगवे गावांत लीज देत या सर्व्हेमधील लोहखनिज उत्खनन करण्यासाठी ई-निविदा मागविल्या होत्या. या दोन्ही गावांतील सुमारे १०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात लोहखनिजाचे उत्खनन केले जाणार आहे. यासाठी नवीन खनिज सुधार कायद्यानुसार राज्य शासनाने बांदा व डेगवे गावातील लोहखनीज उत्खननासाठी निविदा मागविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, डेगवे ग्रामस्थांनी याला पूर्णपणे विरोधाची भूमिका ठेवत शासनाने या गावावर खनिज प्रकल्प लादल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)
स्थानिकांकडून जंगलात पाठलाग
४दरम्यान, संबंधित अधिकारी पानवळ येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाच्या मागे असलेल्या डोंगराळ भागात सर्वेक्षणासाठी गेले. हा परिसर शेती-बागायतींनी समृद्ध आहे. खनिज कंपनीचे अधिकारी या ठिकाणी आल्याची कुणकुण लागताच स्थानिक युवकांनी त्यांचा जंगलात पाठलाग केला.
हे कळताच अधिकाऱ्यांनी तेथून पोबारा केला.
तलाठ्यांचे कानावर हात
४याबाबत बांदा येथील तलाठी कार्यालयात संपर्क केला असता आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. स्थानिकांनी प्रस्तावित खनिज प्रकल्पाला विरोध दर्शविल्याने भविष्यात या ठिकाणी शासन विरुद्ध ग्रामस्थ यांच्यात संघर्ष रंगण्याची शक्यता आहे.