मायनिंग प्रकल्पांना थारा नाही
By admin | Published: November 26, 2015 10:45 PM2015-11-26T22:45:47+5:302015-11-27T00:06:27+5:30
प्रवीण देसाई : कंपन्यांची खनिज उत्खननासाठी उत्सुकता
बांदा : डेगवे गावात विपुल वनसंपदा व नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आहेत. तसेच गावात लागवडीखालील क्षेत्र हे मोठे असून गाव नैसर्गिक साधनसुविधेने संपन्न आहे. यामुळे गावात पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कोणत्याही प्रकल्पांना अथवा मायनिंग प्रकल्पांना थारा देणार नसून त्याला पूर्णपणे विरोधाची भूमिका ठेवणार असल्याचे डेगवे उपसरपंच मधुकर देसाई व डेगवे सोसायटी चेअरमन प्रवीण देसाई यांनी डेगवे येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.राज्य शासनाच्या भूविज्ञान आणि खनिकर्म संचलनालयाकडून डेगवे गावात लोहखनिज उत्खननासाठी ई निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. गावातील लोहखनिज उत्खननासाठी निविदा मागविण्यात आली असून यासाठी कित्येक कंपन्यांनी खनिज उत्खननासाठी उत्सुकता दर्शविली आहे.
डेगवे गावातील मालकी हक्काच्या जमिनी मायनिंग लिजखाली घेतल्यास याला प्रखरपणे विरोध करण्यात येईल. डेगवे गाव हा शेती बागायतींनी समृद्ध आहे. या गावाला शासनाने आदर्श ग्राम, कृषिपंढरी गाव व निर्मल ग्राम म्हणून पुरस्कार दिले आहेत. या गावात काजूचे सर्वाधिक उत्पन्न घेण्यात येते. येथील शेतकरी पूर्णपणे शेती बागायतींवर अवलंबून आहे.डेगवे गावातील परिसरात समृद्ध वनसंपदा असून जंगली प्राणी देखिल बहुसंख्येने आढळतात. अशा स्थितीत गावात लोहखनिजपट्ट्यांना मंजुरी देऊन शासनाने गावातील जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. याला गावातून ठामपणे विरोध करण्यात येईल. प्रसंगी याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी डेगवे सरपंच स्वप्नाली आंबेरकर, आबा देसाई, काका देसाई, राजन देसाई, गुणा वराडकर, रावजी देसाई, अमित देसाई आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शासनावर नाराजी
मात्र, याबाबत डेगवे ग्रामपंचायतीला कोणताही पत्रव्यवहार करण्यात आला नसून डेगवे गावातील जनतेला पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आल्याने मधुकर देसाई व प्रवीण देसाई यांनी शासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.