सावंतवाडी बसस्थानकाचा नव्याने आराखडा होणार
By अनंत खं.जाधव | Published: August 14, 2023 04:51 PM2023-08-14T16:51:17+5:302023-08-14T16:52:55+5:30
व्यवस्थापकीय संचालकांकडून आढावा : मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत पाहणी
सावंतवाडी : सावंतवाडी बस स्थानक हे मध्यवर्ती आहे. या बसस्थानकावर अत्याधुनिक सुसज्ज अशी एसटी आगाराची इमारत उभी करा व उर्वरित जागेतून उत्पादन मिळेल असे काही तरी निर्माण करा अशी सुचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना केली. यावेळी चन्ने यांनी नव्याने आराखडा बनविण्यात येईल असे स्पष्ट केले.
मंत्री दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी सावंतवाडी एसटी आगाराची पाहणी केली. यावेळी एसटी महामंडळाचे मुख्य वास्तुविशारद निलेश रहिवाल, कार्यकारी अभियंता मीनल सोनवणे, सिंधुदुर्ग व्यवस्थापक अभिजित पाटील, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, आबा केसरकर, गजानन नाटेकर, अँड निता सावंत कविटकर, नंदू गावडे आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर यांनी सावंतवाडी एसटी आगाराच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली. बस स्थानकाची भरपूर जागा आहे. याठिकाणी असलेल्या जमिनीचा पुरेपूर उपयोग करून घेताना एसटी महामंडळाने स्वत:च्या उत्पादन वाढीसाठी वेगवेगळे प्रयोग करावेत. एसटी महामंडळाने स्वतः एखादा मॉल उभारणी करावा. त्यासाठी सर्व संबंधितांनी योग्य तो आराखडा जलदगतीने करावा अशा सुचना मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनीही एसटी बस स्थानकावर सर्व अधिकाऱ्यांची डेपोत बैठक घेऊन मंत्री केसरकर यांच्या निर्देशानुसार जलदगतीने प्रस्ताव व आराखडा तयार करण्यासाठी सुचना केल्या.