सिंधुदुर्गचा पर्यटनाबरोबरच आध्यात्मिकदृष्ट्या विकास - दीपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 06:39 PM2023-04-16T18:39:26+5:302023-04-16T18:40:39+5:30
सिंधुदुर्गचा पर्यटनाबरोबरच आध्यात्मिक दृष्ट्याविकास होत असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
सावंतवाडी : साईबाबा हयात असताना कविलकाटे येथे साई मंदिर, तर स्वामी समर्थांच्या पादुका वेंगुर्ल्यात असल्याने तसेच साटम महाराज राऊळ महाराज अशी अनेक संत लाभल्याने सिंधुदुर्ग हा भक्तीमार्गातील लोकांचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा पर्यटना बरोबरच अध्यात्मिकदृष्ट्या विकास होण्यासाठी पर्यत सुरू आहेत, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात शनिवारी स्वामींच्या मुळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री केसरकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रदर्शनाचे प्रमुख तथा वेंगुर्ल्याचे सुपुत्र संजय वेंगुर्लेकर, सचिन वालावलकर, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे आबा केसरकर, सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, भारती मोरे, शर्वरी धारगळकर, दिपाली सावंत, विश्वास घाग आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, मी राज्याचा मंत्री असलो तरी राज्याचा विकास डोळ्यासमोर आहे. परंतु जिल्ह्याचा आणि विशेषतः या ठिकाणी घर असल्याने सावंतवाडीवर अधिकचा लक्ष देणार आहे भक्ती मार्गातून चांगले काम होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याला संतांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वामींच्या चित्र प्रदर्शनाचा लाभ भक्तांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. स्वामीचे मूळ स्थान असलेल्या अक्कलकोट परिसराचा विकास शासन करणार असून ह्या विकासासंदर्भात कोणाच्या काही सूचना असतील तर त्यांनी माझ्याकडे दिल्यास मी त्या तिथपर्यंत पोहोचवेण असे आश्वासन ही यावेळी उपस्थितांना मंत्री केसरकर यांनी दिले.