लोकसभा नाही, विधानसभाच लढवणार; दीपक केसरकर यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 10:48 AM2023-11-13T10:48:54+5:302023-11-13T10:49:14+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीत अपप्रचार केल्याचा दावा
सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले, ते खरे नाही. आम्ही काही ग्रामपंचायत या युतीमधून लढवल्या होत्या. त्यामुळे एकही ग्रामपंचायत नाही म्हणणे चुकीचे आहे. मी आमदारकी सोडून खासदारकी लढविणार, असा ही प्रचार केला; पण काहींच्या मनातील हा गोड गैरसमज दूर होण्यासाठीच मी २०२४ची विधानसभाच लढविणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले.
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मतदारसंघातील बरीच विकासकामे पूर्ण झाल्याचा दावाही केला.
यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, राज्याच्या शिक्षण विभागात केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणात बदल होत आहेत. त्यामुळे शिक्षणामध्ये महाराष्ट्र राज्य पुढच्या वर्षी एक नंबरवर असणार आहे. राज्य सरकारकडून लाखांहून अधिक जास्त सरकारी नोकर भरती करण्यात आली. तर राज्यात ६१ हजार शिक्षकांना टप्पा अनुदानावर आणल्याचे त्यांनी सांगितले.
गैरसमज दूर करण्यासाठी आमदारकीच लढवणार
मी आमदारकी नाही तर खासदारकी लढवणार, असा प्रचारही काहींकडून करण्यात येत आहे. मात्र, काहींच्या मनातील हा गैरसमज दूर करण्यासाठी मी २०२४ मध्ये आमदारकीच लढवणार आहे. शिवाय पक्षाकडून खासदारकीसाठी या मतदारसंघातून जो कोणी उमेदवार असेल त्याला ५० हजारांचे लीड मिळून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘त्या’ निवृत्त शिक्षकांना मानधन मिळणार
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होऊ नये, म्हणून राज्यातील शाळांमध्ये नेमण्यात आलेल्या निवृत्त शिक्षकांना अद्यापही मानधन मिळाले नसल्याबाबत मंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिले असता, निवृत्त शिक्षकांना तत्काळ मानधन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा समाजबांधवांना टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकारमध्ये कोणताही मतभेद नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांशी चर्चा करूनच काही निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. मराठा समाजबांधवांना आरक्षण देताना ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणारे असावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी मराठा बांधवांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारला डाटा मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. सावंतवाडी मतदारसंघांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले. आम्ही गाव पॅनल म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो तर खानोली व मातोंड या दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढवण्यात आली. त्यामुळे काही ग्रामपंचायत नाही, असा प्रचार करणे चुकीचे आहे.