गेल्या २५ वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला, चौकुळ ग्रामस्थांनी मिरवणूक काढत मंत्री केसरकरांचा नागरी सत्कार केला
By अनंत खं.जाधव | Published: October 7, 2024 04:41 PM2024-10-07T16:41:42+5:302024-10-07T16:45:10+5:30
सावंतवाडी : गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चौकुळ गावातील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नावर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ...
सावंतवाडी : गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चौकुळ गावातील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नावर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सर्वमान्य तोडगा काढत शासन निर्णय निर्गमित केले. त्याबद्दल चौकुळ गावाच्यावतीने वाजतगाजत मंत्री केसरकर यांची मिरवणूक काढत नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी केसरकर यांनी चौकुळ गावात पर्यटन वाढीसाठी आपला प्रयत्न राहणार असून चौकुळशी असलेले नाते कधीही कमी होणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण राणे , सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, सरपंच लीना गावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, कबुलायतदार गावकर जमिनीचा प्रश्न सोडवण्यास यश आलं याबद्दल मला समाधान वाटते. आता आपल्या जमिनीमध्ये विविध व्यवसाय सुरू करावेत. शासनाच्या योजना घ्याव्यात. ज्या ज्या वेळी माझी मदत लागेल त्यावेळी मी आपणास सहकार्य करेन. मी हा प्रश्न निवडणुकीसाठी सोडवलेला नाही. तर सर्वांच्या प्रेमापोटी हा प्रश्न सोडविला असल्याचे ते म्हणाले.
कै. भरत गावडे, रामभाऊ गावडे यांच्यासारखी माणसं माझे सहकारी म्हणून होते. त्यांच्या गावासाठी काहीतरी केले पाहिजे अशी माझी भावना असून यापुढे माझे नेहमीच आपणास सहकार्य राहील असे स्पष्ट केले. आंबोली, चौकुळ व गेळे येथील गावाशी आमच्या कुटुंबाचे त्रृणानुबंध आहे. या परिसरात पर्यटन वाढीसाठी वाव आहे. त्यासाठी मी सदैव तत्पर आहे.