बंदूक नोटीस प्रकरणावरुन दीपक केसरकरांनी विरोधकांना दिलं प्रत्युत्तर, म्हणाले..
By अनंत खं.जाधव | Published: April 3, 2024 06:13 PM2024-04-03T18:13:42+5:302024-04-03T18:19:38+5:30
पोलिस प्रशासनाकडून सावंतवाडी तालुक्यातील १३ जणांना बजावलेल्या नोटिसामध्ये शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याही नावाचा समावेश
सावंतवाडी : निवडणूक कालावधीत शस्त्र जमा करण्याचे आदेश असल्याने पोलिस प्रशासनाकडून सावंतवाडी तालुक्यातील १३ जणांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याही नावाचा समावेश होता. या नोटिसी वरून केसरकर हे विरोधकांच्या रडारवर आले आहेत. त्याला आता केसरकरांनीही प्रत्युत्तर दिले आहे. केसरकर म्हणाले, मी एक शांतता प्रिय नेता आहे. आम्ही बंदुका फक्त शस्त्र पूजनासाठीच वापरतो. वडिलांच्या काळातील त्या दोन बंदुका आहेत. असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
मंत्री केसरकर हे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधला. केसरकर म्हणाले, सर्वांना माहीत आहे. मी बंदूक वापरत नाही वडिलांच्या काळातील बंदुका होत्या. त्या वारसा हक्काने प्राप्त झाल्या आहेत. एक माझ्याकडे आहे आणि एक आपल्या भावाकडे आहे. या शस्त्राचा पूजनासाठी वापर करतो. गेल्या ५० वर्षात या शस्त्राचा वापर झालेला नसल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
माझ्यावर गंभीर गुन्ह्यांपैकी कोणताही गुन्हा दाखल नाही. निवडणूक कालावधीत सर्वांची शस्त्रास्त्रे जमा करण्याचे आदेश पारीत होतात. त्याप्रमाणे आमच्याकडे असलेली शस्त्रास्त्रे वेळोवेळी जमा करण्यात येतात. नव्याने आलेल्या न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वच शस्त्रे सरसकट जमा करण्याबाबत योग्य कारण असावे लागते. तसेच हत्यारे जमा करण्याबाबत प्रशासनावर बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सर्व शस्त्रधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे मलाच नोटीस बजावली म्हणून टीका करणे योग्य नाही, असे केसरकर यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.