केसरकरांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये, अन्यथा..; भाजप पदाधिकाऱ्याने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 01:17 PM2022-09-14T13:17:52+5:302022-09-14T13:19:00+5:30
दीपक केसरकर किती खोटारडे आहेत, हे सर्व जनतेला ज्ञात
दोडामार्ग : राज्यात आत्ताच भाजपा-शिंदे गट युतीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आपलेच सरकार असल्यागत वागत आहेत. भाजप कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता युतीची बंधने धुडकारत थंड दहशतवादाने अपरोक्ष त्रास देण्याचे काम करीत आहेत. त्यांनी युतीचा धर्म पाळावा. मुखात देवाचे नाव घेणाऱ्यांनी सज्जनता दाखवावी आणि जनतेला भूलथापा मारू नये. ते असेच वागत राहिल्यास आम्ही प्रखर विरोधात उतरू, असा इशारा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी दिला आहे.
मंगळवारी येथील स्नेह रेसिडेन्सीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, नगरसेवक संतोष नानचे, चंदू मळीक उपस्थित होते.
दीपक केसरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे गेली १३ वर्षे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. या कार्यकाळात त्यांनी कोणता प्रकल्प आणला, तो सांगावा. फक्त प्रकल्पांची घोषणा करायची आणि शांत बसायचे, हे त्यांचे समीकरण. शिवसेना-भाजपा सरकारमध्ये असताना जिल्ह्याचे पालकमंत्री असताना प्रकल्पांची घोषणा केली. त्याचे पुढे काय झाले?
तिलारी धरणाच्या खालच्या बाजूला अमेरिकन कंपनीची गुंतवणूक करून एक प्रकल्प आणायचा होता, त्याचा तर थांगपत्ता नसताना धरण परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचा ॲम्युझमेंट पार्क करत आहेत.केसरकर हे केवळ दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. आमदार म्हणून ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.
भाजप पदाधिकाऱ्यांना बाजूला सारून वैयक्तिक पातळीवर त्रास देत आहेत. केसरकरांचे हे वागणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. यापुढे निवडणुकीत वेगळा निर्णय घ्यावा लागेल. ज्या पद्धतीने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी त्रास देण्याचे काम चालू आहे ते अयोग्य आहे. याबाबत रीतसर तक्रार भाजपा वरिष्ठांकडे आम्ही देणार आहोत. विकासकामांच्या नावाने भूलथापा मारणे बंद करा, असा इशारा दिला दिला आहे.
सडेतोड उत्तर देणार
दीपक केसरकर किती खोटारडे आहेत, हे सर्व जनतेला ज्ञात आहे. अनेकांना याचा अनुभवदेखील आला आहे. आम्ही भाजपामध्येच आहोत. त्यांनी कितीही प्रलोभने दिली तरीदेखील आम्ही भाजपातच राहणार. आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे, याला आम्ही भीत नाही. योग्यवेळी सडेतोड उत्तर देणार असल्याचे भाजपाचे नगरसेवक संतोष नानचे म्हणाले.
५० टक्के सवलत देण्याच्या घोषणा
आडाळी एमआयडीसीतील एक गुंठा जमिनीला शासनाने १ लाख २८ हजार भूखंडाचा दर निश्चित केला आहे. त्याच भूखंडांना दीपक केसरकर ५० टक्के सवलत देणार असल्याच्या घोषणा देत आहेत. हिंमत असेल तर एवढी सवलत त्यांनी देऊन दाखवावीच, असे खुले आव्हान राजेंद्र म्हापसेकर यांनी दिले आहे.