मंत्री दीपक केसरकरांचा खरा चेहरा उघडा करणार, बबन साळगावकरांचा इशारा
By अनंत खं.जाधव | Published: May 30, 2024 06:03 PM2024-05-30T18:03:25+5:302024-05-30T18:03:42+5:30
भुमिगत विद्युत वाहिन्याचा निधी केसरकरांमुळेच परत गेला
सावंतवाडी : भुमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदकडे आलेला निधी माझ्यामुळे मागे गेला अशी चुकीची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. त्याच्या या आरोपांना विधानसभा निवडणुकीत गावागावात जाऊन उत्तर देणार असून त्याचा खरा चेहरा जनतेसमोर उघडा करणार असल्याचा इशारा सावंतवाडी नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
साळगावकर म्हणाले, भुमिगत विद्युत वाहिन्या आलेला निधी परत गेला त्याला मी नाही तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हेच जबाबदार आहेत. कारण, खोदाई केलेले रस्ते बुजवण्यासाठी आपण जिल्हा नियोजनमधून निधी देतो असे आश्वासन देऊनही केसरकर यांनी तो निधी दिला नाही. म्हणूनच हे काम होऊ शकले नाही असा प्रत्यारोप साळगावकर यांनी केला. आजपर्यंत केसरकर यांनी जनतेला फसवण्याचाच प्रकार केला आहे. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उघड करणार आहे.
सावंतवाडी शहरातील मंजूर झालेल्या भुमिगत वीज वाहिन्याना निधी देण्यात खरा वाटा हा तत्कालीन वीज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा होता. केसरकर यांचा यात काडी मात्र ही संबंध नव्हता कारण हा निधी जाहीर झाला त्या ओरस येथील बैठकीला केसरकर नव्हते मी होतो. माझ्या बैठकीतील भाषणावर हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे असे ही साळगावकर म्हणाले.
गेल्या दहा वर्षात विद्युत समस्येवर साधी एक बैठक न घेणारे केसरकर निवडणुकीत मात्र जनतेला भूलभुलैया दाखवतात. आतापर्यंत एक प्रकल्प आणला नाही मात्र प्रकल्पाचे श्रेय घेऊन मते घेऊन जातात. मल्टीस्पेवालिटीचे भूमिपूजन केले पण ते रूग्णालय अद्याप उभे केले नाही. फक्त आश्वासना पलीकडे काहीच करू न शकणारे केसरकर यांना आता जनतेला उत्तर द्यावेच लागेल अशा शब्दांत साळगावकर यांनी त्याच्यावर प्रतिहल्ला चढवला आहे.