मंत्री नारायण राणेंची क्षमता संपली, आमदार वैभव नाईकांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 04:58 PM2022-05-23T16:58:03+5:302022-05-23T16:59:16+5:30

केंद्रात मंत्री झाल्यानंतर राणे यांनी गेल्या एक वर्षात जिल्ह्यात एकही उद्योग आणलेला नाही. केंद्रात दिलेले मंत्रिपद हे निव्वळ शिवसेनेवर टीका करण्यासाठीच दिलेले आहे.

Minister Narayan Rane capacity is exhausted, Criticism of MLA Vaibhav Naik | मंत्री नारायण राणेंची क्षमता संपली, आमदार वैभव नाईकांचे टीकास्त्र

मंत्री नारायण राणेंची क्षमता संपली, आमदार वैभव नाईकांचे टीकास्त्र

googlenewsNext

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उद्योग व रोजगार देण्याची क्षमता संपल्यामुळेच कणकवलीतील औद्योगिक महोत्सवाचा प्रयोग पुरता फसला आहे. राणे हे यापूर्वी राज्य सरकार मध्ये उद्योगमंत्री होते. मात्र त्यांनी जिल्ह्यात उद्योग आणले नाहीत. त्यामुळे राणेंवर त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास राहिला नाही. यामुळेच त्यांनी आयोजित केलेल्या औद्योगिक महोत्सवाला त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व जिल्ह्यातील जनता देखील उपस्थित राहिली नाही अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली.

कणकवली येथील विजय भवनमध्ये आज, सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक भूषण परूळेकर, युवासेना उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर उपस्थित होते.

वैभव नाईक म्हणाले, राणे यांनी आयोजित केलेल्या औद्योगिक महोत्सवाला जनता व त्यांच्याच पक्षाचे लोक का उपस्थित राहिले नाही?  याचा विचार त्यांनी केला पाहिजे. सिंधुदुर्गात आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाला ४० हजार लोकांनी भेट दिली. मात्र ५० लाख रुपये खर्च करून राणे यांनी आयोजित केलेल्या औद्योगिक महोत्सवाला ४०० लोकांनी देखील भेट दिली नाही.

मंत्रिपद निव्वळ शिवसेनेवर टीका करण्यासाठीच

केंद्रात मंत्री झाल्यानंतर राणे यांनी गेल्या एक वर्षात जिल्ह्यात एकही उद्योग आणलेला नाही. केंद्रात दिलेले मंत्रिपद हे निव्वळ शिवसेनेवर टीका करण्यासाठीच दिलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला यामुळे कळून चुकले आहे की, राणे या जिल्ह्यात रोजगार निर्माण करू शकत नाहीत. आणि जिल्ह्याचा विकास पण करू शकत नाहीत. राणे हे केवळ शिवसेनेवर आरोप करण्यापुरते उरले आहेत. त्यामुळे येत्या काळात सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून किंवा अन्य विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास केला जाईल.

राणेंचे उद्योग महाराष्ट्राने पाहिले

राणे नेहमी सांगतात की मी उद्योजक आहे. मात्र जिल्ह्यातील जनतेला मी आवाहन करेन की, उद्योजक म्हणून राणे यांचा आदर्श कुणीच घेऊ नये. कारण त्यांनी आतापर्यंत काय उद्योग केले हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत.  नेहमीच इतरांवर टीका करण्याच्या राणेंच्या भूमिकेमुळे त्यांचा दोन वेळा पराभव झाला. लोक उद्योग किंवा औद्योगिक क्षेत्रात येण्यास तयार आहेत पण हा औद्योगिक महोत्सव राणेंनी घेतल्यामुळे त्याला लोकांनी प्रतिसाद दिला नाही. असा टोलाही वैभव नाईक यांनी लगावला.

Web Title: Minister Narayan Rane capacity is exhausted, Criticism of MLA Vaibhav Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.