आयत्या निधीवर मंत्र्यांचा डल्ला

By admin | Published: February 29, 2016 10:40 PM2016-02-29T22:40:05+5:302016-03-01T00:10:23+5:30

भास्कर जाधव : गुहागरातील कार्यक्रमात तीन मंत्र्यांना खोचक टोला

The ministers scolded on the revenues | आयत्या निधीवर मंत्र्यांचा डल्ला

आयत्या निधीवर मंत्र्यांचा डल्ला

Next

गुहागर : आज तीन मंत्री जिल्ह््याला लाभले आहेत. त्यांनी जिल्हा नियोजनमधील आयत्या निधीवर डल्ला मारण्याऐवजी केंद्र व राज्याच्या तिजोरीतून जादा विकासनिधी आणावा, असा खोचक टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावला.
गुहागर नगरपंचायतीच्या माध्यमातून वरचापाट मोहल्ला येथे तीन लाख लीटर क्षमतेची टाकी बांधण्यात येणार आहे. या कामाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर टिकेची झोड उठवली. भास्कर जाधव म्हणाले की, मंत्रीपद असताना कोट्यवधींचा अधिकचा निधी मी आणला. पालकमंत्री असताना अन्य पक्षातील सदस्यांनाही निधी दिला. मात्र, आज शिवसेनेव्यतिरिक्त कुठल्याही पक्षाला निधी मिळत नाही. जिथे निधी दिला जातो, तोही योग्य खर्ची पडत नाही. कारण कुडली येथे नियमात बसत नसतानाही जिल्हा नियोजनमधील २५ लाखांचा निधी २५ घरांसाठी दिला गेला.
नगरपंचायतीची पाच वर्ष पूर्ण होण्याआधी शहरात २४ तास पाणी देण्याचे आश्वासन पूर्णकरणार आहे. यासाठीचा प्राथमिक टप्पा म्हणून नळांना मीटर बसविण्यात आले आहेत. शुद्ध पाणी देण्यासाठी ट्रिटमेंट प्लांट बसविण्याचे कंत्राट पुणे येथील नामांकित कंपनीला दिले जाणार आहे. डीपी प्लान, पूर्णवेळ इंजिनिअर नसल्याने विकासकामात अडचणी येत असल्याचे त्यांनी मान्य केले.
मोहल्ला येथील मदरशाचे बांधकाम कारण नसताना तोडण्याचे काम जाणीवपूर्वक केले गेल्याचा आरोप जाधव यांनी यावेळी केला. हे काम कायद्यामध्ये बसवून करायचे प्रयत्न सुरू असण्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, उपसभापती सुनील जाधव, राजेश बेंडल, दीपक कनगुटकर, नगराध्यक्षा स्नेहा वरंडे, गीता खरे, ना. ह. खरे, सुजाता बागकर, राकेश साखरकर उपस्थित होते.
ग्रामपंचायत काळापासून नळपाणी योजनेसाठी विशेष योगदान देणाऱ्या तत्कालीन सभापती सदानंद आरेकर व माजी आमदार रामचंद्र बेंडल यांचा तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, सुरेश देवकर, सुभाष साखरकर, बाळा तवसाळकर यांच्या कुटुंबियांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी माजी उपसभापती सुरेश सावंत, उपनगराध्यक्ष जयदेव मोरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश शिर्के, युवक तालुकाध्यक्ष मंगेश कदम, शहराध्यक्ष संतोष वरंडे, मोहन बागकर, मनसे तालुकाध्यक्ष राजेश शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

नगरसेवक गैरहजर : फायदा तुम्हालाच
राष्ट्रवादीची एकमुखी सत्ता असल्याने भाजप-सेनेकडून एकही नगरसेवक या कार्यक़्रमाला उपस्थित नव्हता. मात्र, मनसे तालुकाध्यक्ष राजेश शेटे तसेच सेना युवाध्यक्ष राकेश साखरकर उपस्थित होते. साखरकर यांनी आपण भास्कर जाधव यांचे फॅन असल्याचे सांगताच सर्वांच्या भुवया उंचावल्या.


नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाचा खांदेपालट झाल्यापासून पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद सुरु आहेत. याबाबत भास्कर जाधव यांनी जयदेव मोरे नगराध्यक्ष असताना चांगले काम केले., आत्ताचे नगराध्यक्ष एकाच वॉर्डातील असल्याने त्याचा फायदा होईल, असे जाधव म्हणाले.

नेत्यांवर तोंडसुख
भास्कर जाधव यांनी कार्यक्रमादरम्यान सेना - भाजपच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले. त्यांच्या चौफेर भाषणामुळे कार्यक्रमात रंगत आली.

Web Title: The ministers scolded on the revenues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.