मिरजेचा कॉन्स्टेबल इरफान नदाफ सहआरोपी

By admin | Published: April 26, 2017 06:50 PM2017-04-26T18:50:48+5:302017-04-26T18:51:19+5:30

मैनुद्दीनकडून बुलेट भेट भोवली : अटकेसाठी पथक मिरज, मुंबईला रवाना वारणानगर चोरी प्रकरणाची व्याप्ती मोठी

Mirza's Constable Irfan Nadaf Sahaorpi | मिरजेचा कॉन्स्टेबल इरफान नदाफ सहआरोपी

मिरजेचा कॉन्स्टेबल इरफान नदाफ सहआरोपी

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. २६ : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील ३ कोटी ११ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणातील आरोपी मैनुद्दीन मुल्ला याच्याकडून तडजोडीवर बुलेट खरेदी करणारा मिरज गांधी चौक पोलिस ठाण्याचा कॉन्स्टेबल इरफान नदाफ याला सहआरोपी केले आहे.तो सांगली पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झाला आहे. त्याचे मोबाईल लोकेशन मुंबई दाखवत असल्याने त्याच्या शोधासाठी मिरज व मुंबई येथे पथके पाठवल्याची माहिती वरीष्ठ सूत्रांनी दिली.

दरम्यान संशयित संदीप तोरस्कर याच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला बुधवारी पन्हाळा न्यायालयात हजर केले असता आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मैनुद्दीन मुल्ला चोरीनंतर सांगली-मिरज परिसरात वावरत होता. त्याने मिरजेत ‘वसुली’ करण्यात माहीर असलेल्या काही पोलिसांची भेट घेतली. त्यांच्यासोबत झालेल्या पार्टीत वारणानगर येथून कोट्यवधी रुपयांचे घबाड चोरल्याचे त्याने सांगितले. त्यावर पोलिसांनी कोणी काय घ्यायचे, याविषयी मुल्लाशी चर्चा केली. त्यानंतर मैनुद्दीनने सांगली येथील अभय शोरूम येथून ३ लाख सहा हजार किमतीमध्ये दोन बुलेट मोटारसायकली खरेदी केल्या. त्यामध्ये मैनुद्दीन स्वत: वापरत असलेली बुलेट सासू नानुबाई भोरे हिच्या नावावर आहे. दुसरी इरफान याचा भाऊ साजिद नदाफ याच्या नावावर असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या दोन्ही बुलेट पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

कॉन्स्टेबल इरफान हा मिरज गांधी चौक पोलिस ठाण्यात कार्यरत होता. त्याचा भाऊ साजिद रत्नागिरी पोलिस दलात कार्यरत होता. मैनुद्दीनने जबाबामध्ये कॉन्स्टेबल इरफानने आपल्याकडून बुलेट घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर नदाफ बंधूकडे चौकशी करुन त्यांचा अहवाल वरीष्ठांकडे पाठविला. सांगलीच्या पोलिस अधिक्षकांनी या दोघांनाही निलंबित केले आहे. वारणेतील ‘त्या’ खोलीतून ९ कोटी १८ लाख रुपये सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलिसांनी लुटल्याचे तपासात निष्पन्न होवून त्यांचेवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.

चोरीच्या पहिल्या गुन्ह्याचा तपास कोल्हापूरचे स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलिस करीत आहेत. त्या गुन्ह्यात इरफानला सहआरोपी केले आहे. त्याला अटक करण्यासाठी पथक मिरज येथे गेले असता तो पसार झाल्याचे दिसून आले. सध्या मोबाईल लोकेशन मुंबई दाखवित असल्याने पथक त्याच्या शोधासाठी रवाना झाले आहे.

‘सीआयडी’ने केली तिघांकडे चौकशी

वारणेतील ‘त्या’ पैशाची मैनुद्दीनला टीप देणारा संशयित महादेव ऊर्फ गुंडा नामदेव ढोले (वय ४४, रा. कोडोली, ता. पन्हाळा) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या चौकशीमध्ये व्ही. बी. पाटील (रा. वारणानगर) यांचे नाव पुढे आले आहे. या दोघांसह फिर्यादी झुंझारराव सरनोबत, संशयित संदीप बाबासाहेब तोरस्कर (रा. बापट कॅम्प, कोल्हापूर) यांचेकडे ‘सीआयडी’चे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी केल्याचे समजते. पाटील यांचेकडे काही संस्थाच्या व्यवहारातील पैशाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी होती. ‘त्या’ रुममध्ये पैसे आले कोठुन, त्याच्या मुळापर्यंत ‘सीआयडी’चे पथक पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. अत्यंत बारीक मुद्यावर तपास करीत आहे.

मैनुद्दीनचा भाऊ ताब्यात

वारणानगर येथील चोरीमधील सुमारे ७० लाख रुपये मित्र विनायक जाधव याचेकडे ठेवण्यास दिले होते. त्याला दि. ३ जून २०१६ रोजी सायबर चौकात बोलावून त्याच्याकडून ६८ लाख रुपये घेऊन मैनुद्दीन पसार झाला आहे. वर्षभर त्याचा ठावठिकाणा नाही. कोल्हापूर पोलिसांसह ‘सीआयडी’ चे पोलिस त्याचा मागावर आहेत. तो कुठे आहे, याची चौकशी करण्यासाठी भाऊ कादर मुल्ला याला स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्सही पोलिसांनी मागविले आहेत.

Web Title: Mirza's Constable Irfan Nadaf Sahaorpi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.