Sindhudurg: तळवडे ग्रामपंचायतीत अपहार, सामाजिक कार्यकर्ते जाधव यांनी केला गंभीर आरोप
By अनंत खं.जाधव | Published: August 17, 2024 05:12 PM2024-08-17T17:12:37+5:302024-08-17T17:12:58+5:30
'याप्रकरणी सर्व संबंधितांची मालमत्ता तपासली जावी'
सावंतवाडी : तळवडे ग्रामपंचायतीत ७३ लाख रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा गुन्हा सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला असला तरी, प्रत्यक्षात एक कोटी वीस लाख रुपयांचा अपहार झाला आहे. ठेकेदार आणि अधिकारी यांनी मिळून घोटाळा केला आहे. ठेकेदारासह पाच जण नव्हे तर एकूण १४ जणांचा या घोटाळ्यात समावेश आहे असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते नारायण उर्फ बाळा जाधव यांनी केला. ते शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शंकर सावंत उपस्थित होते.
तळवडे ग्रामपंचायतीत अपहार झाल्या प्रकरणी तळवडे सरपंच, ग्रामसेवक आणि तीन ठेकेदार अशा पाच जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात चौकशी समितीत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे या प्रकरणात अडकले आहेत. त्यामुळे पाच जण नव्हे तर १४ जणांचा या प्रकरणांमध्ये समावेश आहे. त्यांची नावे गुन्हा दाखल करताना देण्यात आली नाहीत. मात्र आम्ही प्रत्यक्षात कागदपत्रांच्या पुराव्यासह पोलीस निरीक्षक यांना सविस्तर माहिती सादर करून सर्व संबंधिता विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले
पोलीस ठाण्यात ७२ लाख ८१ हजार रुपयांच्या अपहार झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. मात्र अपहाराचे ऑडिट केले तर ते एक कोटी वीस लाखापर्यंत जाऊ शकते त्यामुळे पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी तसेच २० फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १४ जणांचा समावेश असल्याचे लेखी पत्र गटविकास अधिकारी यांना दिले.
पण गटविकास अधिकारी यांनी लेखापरीक्षणाचे कारण देत गुन्हा दाखल केला नव्हता. आता गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे पोलिसांनी सर्व प्रकरणाचे ऑडिट करावे आणि सर्वसंबंधीच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगतमताने हा सारा प्रकार घडला आहे त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही. जनतेच्या करातून एकेक पैसा खर्च झाला आहे तो कुणाच्या खिशात जाण्यासाठी नव्हे तर विकास कामासाठी आहे असे त्यांनी सांगितले.
ठेकेदारांनी अधिकाऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वळवले आहेत त्याबाबत आमच्याकडे पुरावे आहेत, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी सर्व संबंधितांची मालमत्ता तपासली जावी. तसेच वारंवार अपहार करणाऱ्या ग्रामसेवकाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही जाधव यांनी केली.