बुडालेले ‘फोमेन्तो पोश’ सापडले

By admin | Published: April 22, 2016 10:30 PM2016-04-22T22:30:15+5:302016-04-22T23:54:35+5:30

पाणबुड्यांना यश : बार्जला बाहेर आणण्याचे प्रयत्न सुरु; रेडी समुद्रात राबविली शोधमोहीम

The missing 'fomento pose' was found | बुडालेले ‘फोमेन्तो पोश’ सापडले

बुडालेले ‘फोमेन्तो पोश’ सापडले

Next

सावंतवाडी : चार दिवसांपूर्वी रेडी समुद्र्रात बुडालेल्या ‘फोमेन्तो पोश’ या बार्जचा शोध घेण्यात पाणबुड्यांना यश आले असून, रेडी बंदरापासून दोन किलोमीटर परिसरात हे बार्ज आढळून आले आहे. हे बार्ज समुद्रात अंदाजे १७ मीटर खोल आहे. बार्जला शोधण्यासाठी शुक्रवारी दिवसभर युद्धपातळीवर शोधमोहीम राबविली. त्यानंतर त्यांना यश आले आहे. आता या बार्जला बाहेर आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले असून, बुडालेल्या बार्जला शोधण्यासाठी गोवा-वास्को येथून खास पाणबुडे मागविण्यात आले होते.
चार दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवारी सायंकाळी बंदरावरून मालवाहू जहाजाकडे खनिज वाहून नेणारे बार्ज बंदरापासून काही अंतरावर गेल्यानंतर पाण्याच्या मोठमोठ्या लाटांमध्ये अडकले आणि बार्जच्या मशीनमध्ये पाणी गेल्याने ते समुद्रात बुडाले. मात्र, सुदैवाने यातील चार खलाशी सुखरूप बचावले आहेत. बार्ज बुडल्यानंतर ते समुद्रतळाला कुठे गेले, याचा कोणताच थांगपत्ता गेले दोन दिवस लागत नव्हता.
यामुळेच बार्जचे मालक अमेय प्रभूतेंडुलकर यांनी हे बार्ज शोधून काढण्यासाठी गोवा-वास्को येथील मार्कलीन फर्नांडिस, विनोद नाईक, रायमोड डेसा, आदींची टीम पाणबुड्यांसह मागविली होती. ती पाणबुड्यांची टीम शुक्रवारी
सकाळी रेडी येथे दाखल झाली. त्यानंतर ते खोल समुद्रात उतरले. यावेळी त्यांना अवघ्या तीन ते
चार तासांतच या बार्जचा ठावठिकाणा लागला. बंदरापासून दोन
किलोमीटर अंतरावर हे बार्ज असून, ते समुद्रतळाशी अंदाजे १७ मीटर खाली गेले असल्याचे या पाणबुड्यांनी सांगितले आहे.
हे बार्ज पाणबुड्यांना आढळून आल्याने आता बार्ज काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत. बार्जचे मालक अमेय प्रभूतेंडुलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही काही करून हे बार्ज समुद्रातून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करणार असून, आता आम्हाला हे बार्ज नेमके कोठे आहे, याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसांत गोवा तसेच अन्य ठिकाणांवरून खास के्रन मागविण्यात येणार आहे.
ज्या दिवशी बार्ज बुडण्याचा प्रकार घडला, तेव्हा मोठ्या लाटा समुद्रात होत्या. पहिली लाट आली तेव्हा काहीअंशी बार्जमध्ये पाणी गेले होते. त्यामुळे अधिक वेगाने बार्ज जहाजापर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू होते; पण दुसरी लाट आली आणि त्यात ती पाण्याखाली गेली. क्षमतेपेक्षा जास्त खनिज या बार्जमध्ये नसल्याचा खुलासाही प्रभूतेंडुलकर यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण
रेडी येथे दोन वर्षांपूर्वी गोव्यातील एका कंपनीची बार्ज बुडाली होती. त्यात एका खलाशाचा मृत्यू झाला होता. त्या खलाशाचा अद्यापपर्यंत शोध लागला नाही. तसेच बुडालेले बार्ज समुद्रात कुठे गेले, याचीही माहिती मिळाली नाही.
कालांतराने या बार्जचा सुगावा मच्छिमारांना लागला. मच्छिमारांची जाळी बार्जमध्ये अडकून फाटत होती. त्यामुळे या बार्जचे सुटे पार्ट करून बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामुळे रेडी बंदरावरच्या सुरक्षेवरही अनेकवेळा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Web Title: The missing 'fomento pose' was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.