कणकवलीतील बेपत्ता तरुणी पोहचली छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त भागात, पोलिसांनी इन्स्टाग्रामवरून काढले शोधून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 02:16 PM2022-12-15T14:16:08+5:302022-12-15T14:16:43+5:30
कणकवली पोलिसांच्या कामगिरीबाबत कौतुक
कणकवली : कणकवली येथून छत्तीसगढ राज्यात पोहोचलेल्या तरुणीचा कणकवली पोलिसांनी छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भागात जाऊन छडा लावला आणि त्या तरुणीला सुरक्षित व सुखरूप कणकवलीत आणून आईच्या हवाली केले.
पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलिस नाईक मनोज गुरव, प्रणाली जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली. कणकवली शहरालगत आशिये गावातील एक तरुणी १६ नोव्हेंबर रोजी बँकेत जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली. ती पुन्हा परतली नसल्याने ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने १७ नोव्हेंबर रोजी कणकवली पोलिस ठाण्यात दिली होती. त्या तरुणीचे इन्स्टाग्राम अकाउंट पोलिसांनी तपासले असता बेपत्ता तरुणी ही छत्तीसगढ राज्यातील दुबछोला जिल्हा कोरिया या अतिदुर्गम भागातील मैत्रिणीच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले होते.
पोलिसांच्या कामगिरीबाबत कौतुक
बेपत्ता तरुणीचे लोकेशन मिळताच उपनिरीक्षक अनिल हाडळ पथकासह ९ डिसेंबर रोजी रेल्वेने छत्तीसगढच्या दिशेने रवाना झाले. कणकवली पोलिसांनी छत्तीसगढमधील खडगवा येथील स्थानिक पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या सहकार्याने कोरिया जिल्ह्यातील दुबछोला, चिरीमिरी या दुर्गम भागातून बेपत्ता तरुणीच्या इन्स्टाग्रामवरून मैत्रिणीचे घर शोधून काढले. बेपत्ता तरुणीला ताब्यात घेत छत्तीसगढमधून सुरक्षित कणकवलीत आणून तिच्या आईच्या हवाली केले. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वस्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.