सीमकार्डचा गैरवापर; दोघांवर गुन्हा

By admin | Published: July 31, 2016 12:29 AM2016-07-31T00:29:19+5:302016-07-31T00:29:19+5:30

शिरगाव येथील प्रकार : दहशतवादविरोधी पथकाची सिंधुदुर्गातील पहिलीच कारवाई

Misuse of SIM card; Crime on both sides | सीमकार्डचा गैरवापर; दोघांवर गुन्हा

सीमकार्डचा गैरवापर; दोघांवर गुन्हा

Next

देवगड, सिंधुदुर्गनगरी : शिरगाव येथील मोबाईल विक्रेता नरेश सुभाष चव्हाण व युसन चंद्रमान तमांग यांनी सीमकार्डधारकाची संमती नसताना सीमकार्डचा गैरवापर करून दिशाभूल केल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
देवगड न्यायालयासमोर शनिवारी हजर केले असता दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. दहशतवाद विरोधी पथकामार्फत दहशतवादी कारवाईच्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. यावेळी फोन संभाषण तपासणी मोहीम राबविली असताना शिरगाव येथील मोबाईल विक्रेत्याने नेपाळी युवकाला दिलेल्या सीमकार्डवरून नेपाळमध्ये सतत आठ महिने वारंवार कॉल झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे दशतवादी पथक व देवगड पोलिस यांनी संयुक्त कारवाई मोहीम राबवून दोघांना अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड आगारात वाहक पदावर कार्यरत असणारे दत्ताराम यशवंत खांदारे (रा. शिरगाव) यांनी आठ महिन्यांपूर्वी शिरगाव येथीलच नरेश सुभाष चव्हाण यांच्या दिनेश मोबाईल शॉपीमधून ७२६४९२००१५ या नंबरचे सीमकार्ड विकत घेतले होते.
हे सीमकार्ड चालू होत नसल्यामुळे खांदारे यांनी ते पुन्हा मोबाईल शॉपी विक्रेते चव्हाण यांना परत दिले व सुरू करून देण्यास सांगितले. मात्र, चव्हाण यांनी खांदारे यांच्या नावावरती नोंदणी झालेले सीमकार्ड परस्पर युसन चंद्रमान तमांग यांना दिले. तमांग या सीमकार्डवरून आपल्या गावी नेपाळ येथे नातेवाइकांशी वारंवार आठ महिने संपर्क साधायचे. या सीमकार्डचा गैरवापर केल्याप्रकरणी नरेश चव्हाण व युसन तमांग यांच्याविरुद्ध देवगड पोलिस ठाण्यात मूळ सीमकार्ड मालक खांदारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सीमकार्डधारकाची संमती नसताना सीमकार्डचा अपहार करून दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दोघांनाही दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास देवगड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण करीत आहेत.(प्रतिनिधी)
सीमकार्डधारकांची पडताळणी सुरू
जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाच्यावतीने जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या सीमकार्डधारकांची पडताळणी सुरू आहे. सीमकार्ड कोणाच्या नावे आहे, त्याचा वापर कोण करतो, सीमकार्ड घेताना ग्राहकाने दिलेली माहिती सत्य आहे का? खोट्या माहितीच्या आधारे सीमकार्ड घेतले आहे का, याची तपासणी करण्यात येत आहे. देशासह जगभरात दहशतवादी संघटनांच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात येत आहे.
नागरिकांना पोलिस अधीक्षकांचे आवाहन
जिल्ह्यातील नागरिकांनी सीमकार्ड खरेदी करताना सावधगिरी बाळगावी. आपले सीमकार्ड दुसऱ्याला वापरायला देऊ नये. आपल्या सीमकार्डचा बेकायदेशीर कृत्यासाठी वापर होऊ शकतो. त्यामुळे सीमकार्ड विक्रेते व वितरकांनी ग्राहकांच्या कागदपत्रांची खातरजमा करूनच सीमकार्डची विक्री करावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी केले आहे.

Web Title: Misuse of SIM card; Crime on both sides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.