कणकवली बंदला संमिश्र प्रतिसाद

By admin | Published: April 3, 2015 11:26 PM2015-04-03T23:26:53+5:302015-04-04T00:07:08+5:30

न्याय देण्याची मागणी : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर व्यापाऱ्यांचा मोर्चा

Mixed composite response | कणकवली बंदला संमिश्र प्रतिसाद

कणकवली बंदला संमिश्र प्रतिसाद

Next

कणकवली : कणकवली शहर तसेच परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणांच्या पोलिसांच्या तपास पद्धतीबाबत नाराजी व्यक्त करीत व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंदच्या दिलेल्या हाकेला शुक्रवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शहरातील पटकीदेवी मंदिरापासून बाजारपेठमार्गे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापर्यंत व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांना निवेदन देऊन आपल्याला न्याय देण्याची मागणी केली.कणकवली शहर व परिसरात गेल्या वर्षभरात घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी शहरातील तीन युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान घरफोडी प्रकरणातील सोने विकत घेतलेल्या सुवर्णकाराचे नाव समोर आले होते. या सुवर्णकारासह अन्य सुवर्णकारांवर पोलीस दडपशाहीने कारवाई करीत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला होता. सुवर्णकाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. त्यामुळे गुरुवारी व्यापाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आपले म्हणणे मांडले होते. तसेच पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करीत कणकवली बाजारपेठ ‘बंद’ची हाक दिली होती. याला प्रतिसाद देत शुक्रवारी सकाळपासून बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद होती, तर तुरळक प्रमाणात काही दुकाने उघडी होती.
शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील पटकीदेवी मंदिराकडून उपविभागीय पोलीस कार्यालयापर्यंत व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. यामध्ये सुवर्णकारांसह काही नागरिकही सहभागी झाले होते. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक, माजी आमदार राजन
तेली यांच्यासह काही राजकीय नेतेही या मोर्चात सहभागी झाले होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांना दैवज्ञ हितवर्धक समाज संघटना कणकवली, कणकवली तालुका व्यापारी महासंघ तसेच धनंजय कसवणकर यांच्या
पत्नी शिवानी कसवणकर यांनी निवेदन सादर केले. तसेच आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी केली. (वार्ताहर)
तपासात पक्षपातीपणा नाही
घरफोडीप्रकरणी पोलिसांचा कायदेशीररीत्या तपास सुरू आहे. आमच्या तपासावर वरिष्ठ अधिकारी तसेच न्यायालयाचा अंकुश असतो. आम्ही सर्वेसर्वा नाही. त्यामुळे तपास करताना पक्षपातीपणा होणार नाही, तसेच आरोपी सोडून कोणावरही विनाकारण कारवाई होणार नाही, असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.
...तर तीव्र आंदोलन
कणकवली बाजारपेठ बंद ठेवून तसेच मोर्चा काढून पोलिसांकडे न्याय मिळण्यासाठी मागणी केली आहे. मात्र, पोलिसांची दडपशाही अशीच सुरू राहिल्यास तसेच न्याय न मिळाल्यास जिल्ह्यातील सुवर्णकार, व्यापाऱ्यांच्यावतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी शुक्रवारी हॉटेल साईपॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

Web Title: Mixed composite response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.