आमदार दीपक केसरकरांना निवडणुका आल्या की 'उद्योग' आठवतात, संजू परबांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 03:59 PM2022-02-07T15:59:02+5:302022-02-07T15:59:24+5:30
कोणीही निदा.. कोणीही वदा, टामटूम करणे हा माझा धंदा असे म्हणत केसरकर यांची खिल्ली उडविली
सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांना निवडणुका आल्या की उद्योग आठवतात. त्यांनी गेली बारा वर्षे काथ्या उद्योग देतो म्हणून फसवणूक केली. आता खाऊ गल्लीच्या नावावर जनतेची दिशाभूल करतात अशी टिका माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली. यावेळी त्यांनी कोणीही निदा कोणीही वदा.. टामटूम करणे हा माझा धंदा असे म्हणत केसरकर यांची खिल्ली उडविली.
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावले, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक उपस्थित होते.
परब म्हणाले, केसरकरांनी मला आपल्या लिस्ट मधून डिलीट केले, तर निवडणुकीच्या तोंडावर त्यांना दारोदारी फिरण्याची वेळ का आली? विधानसभा निवडणुकीत टोकाचे आरोप करणाऱ्या बबन साळगावकरां बरोबर त्यांनी हातमिळवणी का केली ? असा सवाल ही त्यांनी केला.
पालिकेत अजूनही शिवसेनेचे काही नगरसेवक जाऊन बसत आहेत. त्यांना त्या ठिकाणी येण्यास मुख्याधिकाऱ्यांनी बंदी घालावी, अन्यथा आमचे नगरसेवक सुद्धा नगरपालिकेत जाऊन ठाण मांडून बसतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मुख्य अधिकारी यांची भूमिका शिवसेनेच्या शाखाप्रमुखा प्रमाणे आहे. ते त्यांच्या बाजूने आपला कारभार हाकत आहेत.
शहरातील केशवसुत कट्टा वापरास धोकादायक आहे, असे ऑडिट झाले असताना सुद्धा त्या ठिकाणी तुतरी बसविण्यासाठी शिवसैनिकांची धडपड सुरू आहे. त्यामुळे भविष्यात त्या ठिकाणी गर्दी झाल्यास आणि तो पूल कोसळून कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याला सर्वस्वी मुख्याधिकारी जबाबदार राहतील, असेही परब म्हणाले.
निवडणुका आल्या की केसरकरांना फसव्या घोषणा करण्यापलीकडे काही जमलेले नाही. टामटूम आमदार म्हणून ते जनतेत परिचित झाले आहेत. आता ते शहराचे गतवैभव पुन्हा आणू अशी घोषणा करू लागले आहेत आणि अनेक आश्वासने देत फिरत आहेत. त्यात त्यांनी बोटिंग क्लब पुन्हा नव्याने सुरू करण्याची घोषणा केली आहे.
मात्र बारा वर्षात त्यांना जुन्या बोटी दुरुस्त करता आल्या नाहीत. त्या आम्ही आमच्या कार्यकाळात नवीन बोटी आणल्या. आणि त्याच बोटीत केसरकरांनी जलसफरीचा आनंद घेत मोती तलावात अनेक नवीन प्रकल्प राबविण्याच्या घोषणा करत आहेत.
आम्ही मोती तलावाकाठी भरलेल्या आठवडा बाजाराला केसरकरांसह शिवसैनिकांनी विरोध केला. मात्र खाऊ गल्ली सारखा नवीन प्रकल्प केसरकर याच फुटपाथवर राबवत आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होणार नाही का? असा सवालही परब यांनी उपस्थित केला.