..तर समजायचं टोल आंदोलन यशस्वी झाले, नितेश राणेंची शिवसेना नेत्यांवर तिरकस टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 04:09 PM2022-06-02T16:09:32+5:302022-06-02T16:14:44+5:30
टोल नाका जाळणार, फोडणार अशा धमक्या देऊन टोलवसुलीचा ठेका मिळालेल्याला जवळ करायचे अन्
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाक्यावर टोल सुरु होणार आहे. काल, बुधवारी १ जूनपासून टोल वसुली सुरु करण्यात येणार होती. मात्र टोलवसुलीबाबत अद्याप संभ्रम आहे. दरम्यान याविरोधात शिवसैनिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यावरुन आमदार नितेश राणेंनी शिवसेना नेत्यांवर तिरकस टीका केली आहे.
शिवसेनेचे नेते टोल आंदोलन करतात. त्या टोलला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आधीच स्थगिती दिली आहे. शिवसेनेचे काही नेते नवीन फॉर्च्यूनर, इनोव्हा गाड्यांमधून फिरताना दिसतील, त्यावेळी समजावे टोल आंदोलन यशस्वी झाले असा टोला भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे. फोंडाघाट ग्रामपंचायत भवनच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे बोलत होते.
राणे म्हणाले, जिल्हावासीयांना टोल नको असेल तर होणार नाही. मात्र हे शिवसेनेचे आंदोलन टोल विरोधी आहे काय ? शिवसेना नेत्यांच्या गाड्या जुन्या झाल्या आहेत. काही लोकांच्या फॉर्च्यूनर जुन्या झाल्या आहेत तर काहींचे इनोव्हाचे हप्ते थकल्याने जप्ती आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करायची तर त्यांना लोकांमध्ये जावे लागते, आणि हे दुचाकीवरून गेले तर यांना कोण विचारणार आहे का? त्यासाठी मोठी गाडी पाहिजे. ती गाडी मिळवण्यासाठी हे टोल विरोधी आंदोलन सुरू आहे.
टोल नाका जाळणार, फोडणार अशा धमक्या देऊन टोलवसुलीचा ठेका मिळालेल्याला जवळ करायचे आणि गाडी मिळवायची. आता काही दिवसांनी या सेना नेत्यांकडे नव्या गाड्या दिसतील, म्हणजे समजायचे शिवसेनेचे टोल आंदोलन यशस्वी झाले. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी यावेळी केली.