बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार म्हणायचं अन्..; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
By सुधीर राणे | Published: January 24, 2024 12:52 PM2024-01-24T12:52:26+5:302024-01-24T12:54:21+5:30
सत्ता असताना बाळासाहेबांना हिंदूह्रदयसम्राट बोलण्यास 'त्यांना' लाज वाटायची
कणकवली: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा कडवट आणि प्रखर हिंदुत्ववादी नेता आजपर्यंत देशामध्ये झाला नाही. त्यांच्या विचारांना व प्रत्येक इच्छेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभे राहिले असून प्रभू श्री रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला. जर आज बाळासाहेब असते तर ते पाहिल्यानंतर त्यांनी ' शाब्बास मोदीजी' अशी शाबासकी दिली असती. मात्र, त्यांचे हिंदुत्ववादी विचार दुर्दैवाने त्यांच्या मुलाला पुढे घेऊन जाता आले नाहीत. अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.
कणकवली येथे मंगळवारी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, स्वतः बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार म्हणण्याचा ढोंगी पणा करायचा आणि ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत विरोध केला त्यांना साथ करायची असे उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. 'माझ्या शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही', असे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत असायचे. मात्र, उद्धव ठाकरे यांना ते जमले नाही.
बाळासाहेब रुद्राक्ष माळ घालायचे ती नेमकी आता कुठे आहे. याचे उत्तर देण्याच धाडस उद्धव ठाकरे आणि कुटुंबिय करणार आहेत का ? त्यांची सत्ता असताना बाळासाहेबांना हिंदूह्रदयसम्राट बोलण्यास उद्धव ठाकरे यांना लाज वाटायची. तसेच त्यांचे फलकावर फोटो लावण्याचे बंद करून टाकले होते. मात्र, आज शिवसेना पक्ष रसातळाला गेला, तेव्हा बाळासाहेबांची आठवण त्यांना झाली. तसेच बाळासाहेबांसारखे दिसण्याचा प्रयत्न हे बहुरूपी करत आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या मूळ शिवसैनिकांचा त्यांच्यावर विश्वास आहे का? असा प्रश्नही आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला.