१८ दिवसांच्या अज्ञातवासानंतर अखेर आमदार नीतेश राणे जिल्हा बँकेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 07:11 PM2022-01-13T19:11:24+5:302022-01-13T19:12:19+5:30
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेण्या हल्ला झाला होता. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते गायब झाले होते.
ओरोस : जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर २७ डिसेंबर पासून भूमिगत असलेल्या भाजप आमदार नितेश राणे बाहेर पडले आहेत. प्रथमच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात हजेरी लावली. तब्बल अठरा दिवसांनी ते समोर आले.
उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी गुरूवारी पूर्ण झाली. आता १७ जानेवारीला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे तोपर्यंत त्यांना अटक करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे ते गुरूवारी जिल्ह्यात दाखल झाले.
जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी रंगात आलेली असताना १८ डिसेंबर रोजी कणकवली येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेण्या हल्ला झाला होता. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
त्यामुळे या प्रकरणी अटक होऊ नये, यासाठी राणे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत हे २७ पासून भूमिगत झाले होते. जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर २८ व २९ रोजी सुनावणी झाली. ३० रोजी यावर निर्णय देत जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
तब्बल १८ दिवसांनी माध्यमांसमोर
त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यावर अजून उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज ११ वाजता यावर उच्च न्यायालयात सुनावणी होती. त्यामुळे जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी आ राणे उपस्थित झाले नव्हते. परंतु आजच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने १७ जानेवारीपर्यंत निकाल पुढे ढकलला आहे. त्यामुळे नितेश राणे, संदेश सावंत जिल्हा बँकेत दाखल झाले होते.
२७ डिसेंबर पासून तब्बल १८ दिवसांनी ते बाहेर आले आहेत. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह जिल्हा बँक संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.