आमदार निधी खर्च करण्यात नितेश राणेच भारी, जिल्ह्यात आतापर्यंत 'इतका' निधी खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 05:07 PM2023-03-03T17:07:22+5:302023-03-03T17:07:49+5:30
जिल्ह्यात ३ आमदारांसाठी १५ कोटी रुपयांचा आमदार निधी मंजूर
मनोज वारंग
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी शासनातर्फे प्रत्येक आमदाराला ५ कोटीचा आमदार निधी मिळत असतो. ३१ मार्चपर्यंत आमदार निधी खर्च करायचा असतो. आतापर्यंत प्रत्येक आमदाराला ४ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तर उर्वरित प्रत्येकी १ कोटी निधी लवकरच प्राप्त होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ असून या मतदार संघाच्या विकासासाठी शासनाकडून प्रत्येक आमदाराला वर्षाला ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला जातो. यातून ३ आमदारांसाठी एकूण १५ कोटींचा निधी जिल्ह्यासाठी मंजूर आहे. त्यापैकी २०२२-२३ या वर्षात आतापर्यंत प्रत्येक आमदाराला आतापर्यंत प्रत्येकी ४ कोटी रुपयांचा निधी असा एकूण १२ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला मिळाला आहे.
यापैकी १२ कोटी ३ लाखांची कामे मंजूर झाली असून १० कोटी १५ लाख एवढा आमदार निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. हा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करायचा आहे. त्यामुळे याच महिन्यात निधी वितरणाला गती येते. त्यामुळे आमदार विकास निधी वितरणाची व खर्चाची आकडेवारी ही दररोज बदलते. प्रत्येक आमदाराचा विकास निधी हा ३१ मार्चपर्यंत पूर्ण खर्च होत असतोच.
वर्षाला ५ कोटींचा निधी
प्रत्येक आमदाराला मतदार संघाच्या विकासासाठी शासनाकडून प्रत्येक वर्षी ५ कोटी रुपये विकास निधी प्राप्त होतो. परंतु ५ कोटीपेक्षा अधिकच्या कामांनाही प्रशासकीय मंजुरी देता येते. त्यामुळे आमदार हे जास्तीत जास्त कामांच्या फाइल तयार करतात.
निधी खर्चात आमदार राणे आघाडीवर
आमदार निधी खर्चात २०२२-२३ या वर्षात कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे हे आघाडीवर आहेत. त्या पाठोपाठ आमदार दिपक केसरकर आणि आ. वैभव नाईक यांचा समावेश आहे.
नितेश राणे, ३ कोटी ६२ लाख खर्च
कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या आमदार निधी मधून ४ कोटी ७० लाखांच्या कामांना मंजुरी दिली असून त्यापैकी आतापर्यंत ३ कोटी ६२ लाख एवढा निधी खर्च झाला आहे.
दीपक केसरकर, ३ कोटी ५१ लाख खर्च
सावंतवाडी-वेंगुर्ला-दोडामार्ग विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या आमदार निधी मधून ४ कोटी ११ लाखांच्या कामांना मंजुरी दिली असून त्यापैकी आतापर्यंत ३ कोटी ५१ लाख एवढा निधी खर्च झाला आहे.
वैभव नाईक, ३ कोटी २ लाख खर्च
कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदार निधी मधून ३ कोटी १९ लाखांच्या कामांना मंजुरी दिली असून त्यापैकी आतापर्यंत ३ कोटी २ लाख एवढा निधी खर्च झाला आहे.
उर्वरित ३ कोटी लवकरच प्राप्त होणार
जिल्ह्यात ३ आमदारांसाठी १५ कोटी रुपयांचा आमदार निधी मंजूर आहे. त्यापैकी १२ कोटी प्राप्त झाले असून ३ कोटी रुपयांचा निधी लवकरच प्राप्त होणार आहे.