आमदार नितेश राणेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनावर उद्या सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 04:51 PM2022-02-04T16:51:15+5:302022-02-04T17:59:34+5:30
पोलीस कोठडीनंतर आता राणेंची न्यायालयीन कोठडीत रवानगी
कणकवली : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांना पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत ते न्यायालयीन कोठडी असणार आहेत. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज कणकवली न्यायालयात राणे हजर झाले होते. आजच्या सुनावणीकडे राणे कुटुंबीयासह राज्याचे लक्ष होते. मात्र राणे यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. पोलीस कोठडीनंतर आता राणेंची न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार आहे.
आमदार राणे दुपारी ३.२७ वाजता कणकवली न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद करण्यात आला. यानंतर न्यायालयाने राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान राणेंनी जामिनासाठी ओरोस येथील सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर सुनावणीची तारीख दिली जाईल. तर, आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांनाही न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी जिल्हा, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आमदार नितेश राणे कणकवली न्यायालयासमोर शरण आले होते. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आज या पोलीस कोठडीची मुदत संपली असता ते न्यायालयात हजर झाले होते. मात्र आजही राणे यांना दिलासा मिळाली नाही. न्यायालयाने त्यांना पुन्हा १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.