Sindhudurg District Bank Election: आमदार नितेश राणेंना मतदानाचा हक्क नाकारला, सहकार विभागाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 03:46 PM2021-12-30T15:46:01+5:302021-12-30T15:46:51+5:30
या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सिंधुदुर्ग : जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत याचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे अडचणीत आले असतानाच त्यांना आता दुसरा झटका बसला आहे. आमदार राणे यांना सहकार विभागाने बँक निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारला आहे. यावर आता राणे काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे. कारण या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज, गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले आहे. राणे कुटुंबिय आणि शिवसेनेमध्ये जोरदार धुमशान सुरु आहे. या रणधुमाळीत महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे अडचणीत आले. त्यांना या प्रकरणी कधीही अटक होवू शकते. यामुळे आमदार राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायलयात अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यापूर्वी नितेश राणे यांना दुसरा झटका बसला.
आमदार राणे यांना सहकार विभागाने मतदानाचा अधिकार नाकारला आहे. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा बँकेकडून कर्जरुपी घेतलेले 16 कोटी रुपये थकीत आहेत. यामुळे आमदार राणेंना मतदानाचा अधिकार नाकारला आहे. सहकार विभागाच्या या निर्णयामुळे राणेंना आणि भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान आज सकाळीच मतदाना दरम्यान कणकवली तहसील केंद्रावर महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतीश सावंत आणि भाजपाच्या महिला उमेदवार प्रज्ञा ढवण आणि जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. दुपारपर्यंत तालुक्यात ६५ टक्के मतदान झाले.
याच दरम्यान संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी संशयित म्हणून पोलिसांच्या रडारवर असलेल्या वेंगुर्ले येथील मनीष दळवी यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी नाकारला आहे. दळवी हे जिल्हा बँकेसाठी भाजपचे उमेदवार आहेत.