आमदार नितेश राणे उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्ग्णालयात दाखल, समर्थकांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 01:39 PM2022-02-07T13:39:54+5:302022-02-07T19:03:21+5:30
काही वेळा पूर्वी रुग्णवाहिका रवाना झाली आहे. सोबत डॉक्टरांचे पथक तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ओरोस : भाजप आमदार नितेश राणे यांना वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी राणे समर्थकांनी सीपीआर परिसर आवारात गर्दी केली होती.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. १०८ रुग्णवाहिकेने त्यांना जिल्हा रुग्णालयातून आणण्यात आले.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी ४ फेब्रुवारीला नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी कणकवली न्यायालयाने सुनावली होती. त्यानंतर त्यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठज दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना जास्त त्रास जाणवू लागल्याने ५ रोजी त्यांना कोल्हापूर शासकीय रुग्णालयात नेण्याची तयारी केली होती.
मात्र, त्यानंतर पुन्हा जिल्हा रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज अचानक त्यांना कोल्हापूर येथे नेण्याचा निर्णय घेत १०८ रुग्णवाहिकेने नेण्यात येत आहे. काही वेळा पूर्वी रुग्णवाहिका रवाना झाली आहे. सोबत डॉक्टरांचे पथक तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.