Nitesh Rane Arrested: शिवसैनिक परब यांच्यावरील हल्याचा कट पुण्यात शिजला, नितेश राणेंना पुण्याला नेण्याच्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 12:22 PM2022-02-03T12:22:57+5:302022-02-03T12:40:03+5:30
Nitesh Rane to Pune: शिवसैनिक परब यांच्यावरील हल्याचा कट पुणे येथेच शिजला असल्याचा पोलिसांना संशय
सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांना बुधवारी रात्री उशिरा कणकवलीतून सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. मात्र गुरूवारी त्याना पुन्हा तपासासाठी कणकवलीला नेण्यात आले आहे. दरम्यान पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नितेश राणे यांना अधिक तपासासाठी पुणे येथे नेण्यात येणार आहे. परब हल्याचा कट पुणे येथेच शिजला असल्याचा संशय पोलिसांना आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणी काल, बुधवारी आमदार नितेश राणे यांना अटक करण्यात आली. त्याना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधीक्षकांनी राणे यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने त्यांना कणकवलीतून सावंतवाडी येथे आणत येथील पोलीस कोठडीत ठेवले होते.
दरम्यान राणे यांना आज, गुरुवारी सकाळीच अधिक तपासासाठी पुन्हा कणकवली येथे नेण्यात आले. तेथे तपास अधिकारी सचिन हुंदळेकर हे राणे व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची समोरासमोर चौकशी करणार आहेत. त्यानंतर राणे यांना घेऊन सिंधुदुर्ग पोलिस अधिक तपासासाठी पुणे येथे घेऊन जाऊ शकतात असा अंदाज आहे. मात्र यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही. परब हल्याचा कट पुणे येथेच शिजला असल्याचा पोलिसांना संशय आहे, त्यामुळेच त्यांना पुणे येथे नेण्यात येणार आहे.
राणे यांच्या पोलीस कोठडीची मुदत उद्या, शुक्रवारी संपणार असून त्यांना पुन्हा कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयापुढे सरकारी पक्षाला बाजू मांडताना दोन दिवसातील तपासाबाबत भक्कम पुरावे न्यायालयासमोर सादर करायचे आहेत. यामुळेच पोलीस वेगाने तपास करीत आहेत.