नितेश राणेंच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच मतदारांना धमकी, वैभव नाईकांचे टीकास्त्र
By सुधीर राणे | Published: December 13, 2022 04:17 PM2022-12-13T16:17:57+5:302022-12-13T16:38:56+5:30
सिंधुदुर्गमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती
कणकवली : सिंधुदुर्गात ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती करण्यात येत आहे. असे सांगतानाच जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे पॅनेल उभे राहिल्यामुळे भाजपाची अडचण झाली आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या पायाखालची वाळू सरकली असून ते प्रचार सभांमध्ये मतदारांना दमदाटी करीत असल्याची टीका शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
कणकवली येथील विजय भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाची आज, मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, रुपेश आमडोसकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, महिला आघाडी प्रमुख उर्वी साटम, तालुका अध्यक्ष संजय जाधव, अक्षय कदम, युवा आघाडी प्रमुख रोहन कदम, सुरेंद्र कदम आदींसह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
वैभव नाईक म्हणाले, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची आघाडी जिल्ह्यात झाली आहे. भाजपला रोखण्यासाठी तसेच दोन्ही पक्षांचे उमेदवार विजयी करण्याठी एकत्रित मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा विरोधात २९० ठिकाणी थेट लढत होत आहे. आमच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे. राज्यातील सद्याचे सरकार किती काळ टिकणार हे केवळ न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकेल.
नारायण राणेंनी जिल्ह्यात किती उद्योग आणले
नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात किती उद्योग आणले? ग्रामपंचायत मध्ये सत्ता असलेल्या त्यांच्या लोकांनी आतापर्यंत काय विकास केला? हे जनतेने विचारण्याची गरज आहे. भाजपच्या माध्यमातून निधी नाही. भाजपाकडून काही ठिकाणी दडपशाहीच्या मार्गतून अर्ज बाद करण्याचा प्रयत्न झाला आहे. नितेश राणे धमक्या देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, लोक धमक्यांना भीक घालणार नाहीत.
महेश परुळेकर म्हणाले, जातीयवादी पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी आमचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोक चुकीची वक्तव्ये करीत आहेत. सिंधुदुर्ग हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. त्याचे नाव बदनाम केले जात आहे. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे १२ सरपंच पदाचे उमेदवार आणि १०० पेक्षा जास्त सदस्य ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात आहेत.ते निश्चितच विजयी होतील. असेही ते म्हणाले.