प्रकल्प रद्दचे पत्र आणूनच आमदारांनी चर्चेला यावे

By Admin | Published: September 3, 2016 11:05 PM2016-09-03T23:05:17+5:302016-09-04T00:31:08+5:30

सेनेकडून फसवणूक : वायंगणी ग्रामस्थांची भूमिका

MLAs should discuss the project with cancellation letter | प्रकल्प रद्दचे पत्र आणूनच आमदारांनी चर्चेला यावे

प्रकल्प रद्दचे पत्र आणूनच आमदारांनी चर्चेला यावे

googlenewsNext

आचरा : विधानसभा निवडणुकीपूर्वी सी-वर्ल्ड प्रकल्पाला विरोध करणारे आमदार वैभव नाईक आता या प्रकल्पाच्या बाजूने बोलत आहेत. त्यांची ही भाषा लोकांची फसवणूक करणारी असून त्यांनी हा प्रकल्प रद्द केल्याचे पत्र आणावे आणि नंतरच ग्रामस्थांच्या भेटीस यावे, असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
सी-वर्ल्डचे राजकारण करीत वैभव नाईक यांनी निवडणुकीत विजय मिळविला. आता तेच ३५० एकरात प्रकल्प साकारण्याची भाषा करीत आहेत. सी-वर्ल्डवर चर्चा करण्यासाठी ग्रामस्थांकडे येण्यासाठी त्यांना वेळ नाही. यापुढे त्यांनी प्रकल्प रद्द केल्याचे पत्र घेऊन यावे अन्यथा चर्चेला येवू नये, असे या ग्रामस्थांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
मालवण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाईक यांनी ३५० एकरांची अधिसूचना काढण्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी वायंगणी ग्रामस्थांनी कालावल टीकमवाडी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी प्रफुल्ल माळकर, मालती जोशी, मनोहर टीकम, मंगेश आंगणे, चंदू सावंत, समीर वायंगणकर, मंगेश मसुरकर, आबा वायंगणकर, सुधाकर वालावलकर, रामचंद्र वायंगणकर, ब्रह्मानंद टीकम, हनुमंत सावंत, पांडुरंग वायंगणकर, सोनाली सावंत, दीपक जोशी, विलास जोशी, उत्तम खांबल, हरिश्चंद्र सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कायम ग्रामस्थांसोबत असणारे उदय दुखंडे ग्रामस्थांना टाळत असल्याचे दिसून आले. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यावेळी ग्रामस्थांनी सी-वर्ल्डला विरोध केला होता. त्यावेळीही आमदार व खासदारांनी आपण ग्रामस्थांच्या बाजूने असल्याचे सांगून मते मिळविली होती.
वाळू आंदोलनात आमदार नाईक यांनी पुढाकार घेऊन आवाज उठविला होता. त्यांनाच आता वायंगणी-तोंडवळी ग्रामस्थांसाठी वेळ नाही का? असा सवाल या ग्रामस्थांनी केला. सी-वर्ल्ड प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी दोन वर्षांपूर्वी त्यांची भेट घेऊन केली होती. आज नाईक यांना ग्रामस्थांना बोलण्यास वेळ नाही. ते आता ग्रामस्थांना न भेटता पत्रकारांमार्फत आपले मत प्रकट करीत आहेत.
प्रकल्प रद्द करण्याची भाषा विसरून ते ३५० एकराची अधिसूचना काढण्याची भाषा करीत आहेत. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध असून ग्रामसभांनी तसे ठरावही केलेले आहेत. असे असताना शिवसेना लोकांना फसवित आहे. या प्रकल्पाला आमचा विरोध कायम असून आम्हांला कोणत्याही पक्षाच्या कुबड्यांची गरज नाही. आम्ही आमचे आंदोलन स्वबळावर लढवू, असेही ग्रामस्थांतर्फे यावेळी स्पष्ट करण्यात
आले. (वार्ताहर)

Web Title: MLAs should discuss the project with cancellation letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.