मनसेचे ७ सप्टेंबरपासून जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 05:48 PM2020-09-03T17:48:48+5:302020-09-03T17:50:23+5:30
जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच प्रत्येक तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांची हेळसांड होत आहे. तेथे मोठ्या प्रमाणात गैरसोयी आहेत. चांगले जेवण मिळत नाही. खरेदी प्रक्रियेतही घोटाळा होत आहे. या समस्यांबाबत आवाज उठविण्यासाठी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबरपासून जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन छेडणार आहे.
कणकवली : जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच प्रत्येक तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांची हेळसांड होत आहे. तेथे मोठ्या प्रमाणात गैरसोयी आहेत. चांगले जेवण मिळत नाही. खरेदी प्रक्रियेतही घोटाळा होत आहे. या समस्यांबाबत आवाज उठविण्यासाठी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबरपासून जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या गैरसोयीबाबतचे निवेदन मनसेच्यावतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले आहे. तसेच सिंधुदुर्गातील कोविड सेंटरमधील समस्या सोडविण्यासाठी आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी ७ सप्टेंबरला जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे यायचे आहे. जोपर्यंत ते चर्चेला येऊन कोविड सेंटरमधील समस्या सोडविण्याची ग्वाही देत नाहीत तोपर्यंत मनसेचे आंदोलन सुरूच राहणार आहे.
तालुक्यांत असलेल्या कोविड सेंटरमधील रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. कोविड सेंटरमध्ये रुग्ण सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतंत्र प्रसाधनगृहाची सोय नाही. तसेच शौचालय आणि बाथरूम स्वच्छ ठेवले जात नाहीत. याबाबी कोरोना संसर्ग वाढविणाºया आहेत. याखेरीज कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना रुग्णालयाकडून अहवाल देणे आवश्यक आहे. मात्र, सिंधुदुर्गात तसा अहवाल दिला जात नाही.
कोविड रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय असताना तालुकानिहाय असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाच कोविड सेंटरमधील रुग्णांचे स्वॅब घेण्यासाठी, रुग्ण तपासणीसाठी पाठविले जाते. यामुळे डॉक्टर्स, परिचारिका व इतर रुग्णालय कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होत आहे.
कोरोना उपचार सुरू असताना अचानक निधन झालेल्या व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला जातो. वस्तुत: कोरोना अहवाल येईपर्यंत मृतदेह जिल्हा रुग्णालयातच शीतपेटीत ठेवायला हवा. पण तशी कार्यवाही होत नसल्याने जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढत असल्याचेही या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.