दिवाळी रेशन! 'नेत्यांच्या छायाचित्राचे 'बॉक्स की पिशव्या' छापाव्यात हे ठरत नसल्यानेच घोळ'

By सुधीर राणे | Published: October 21, 2022 04:25 PM2022-10-21T16:25:13+5:302022-10-21T16:25:43+5:30

सत्ताधारी आणि विरोधकांकडून जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष

MNS General Secretary Parashuram Uparkar criticized the government over Diwali ration distribution | दिवाळी रेशन! 'नेत्यांच्या छायाचित्राचे 'बॉक्स की पिशव्या' छापाव्यात हे ठरत नसल्यानेच घोळ'

संग्रहित फोटो

googlenewsNext

कणकवली : वाढत्या महागाईला आणि खूप वाईट मार्गाने चाललेल्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपल्या आमदाराची चौकशीपासून सुटका व्हावी यासाठी कुडाळ येथे मोर्चा काढला. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांकडून जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. राज्य सरकारने १०० रुपयांत रेशनवर चार जिन्नस देण्याची केलेली घोषणा अजून पूर्ण झालेली नाही. नेत्यांची छायाचित्रे असलेले बॉक्स की पिशव्या छापाव्यात हे ठरत नसल्यानेच हा घोळ झाला, अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उपरकर म्हणाले, जनतेला कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. अवैध धंदे वाढत चालले आहेत. घोटाळे करून जनतेचा पैसा राजकारणी आणि अधिकारी आपल्या घरात नेत आहेत. लोकप्रतिनिधींचा प्रशासकीय यंत्रणेवर वचक राहिलेला नाही. आर्थिक घोटाळे करून अधिकारी श्रीमंत होत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री दोनदा जिल्ह्यात आले. मात्र, गणेशोत्सवाला दिलेले आश्वासन दिवाळी आली तरी पूर्ण झालेले नसून रस्त्यावरील खड्डे भरले गेले नाहीत. जनता न्यायासाठी रस्त्यावर उतरत आहे. तरीही तिला न्याय मिळत नाही.

आमदाराला चौकशीपासून मुक्त करा, अशी मागणी करीत मोर्चा काढण्यापेक्षा जनतेचा थोडा तरी विचार करावा. सर्वच पक्षांनी जनतेची निराशा केलेली आहे. ज्याप्रमाणे राज ठाकरे राज्यात आज समंजसपणाचे राजकारण करत आहेत. त्या समांजसपणाला काहीजण स्क्रिप्ट म्हणतात. मात्र, राज ठाकरे हे काम अगदी प्रामाणिकपणे आणि समंजसपणे करत आहेत. त्यांच्यासारखी भूमिका सर्वांनीच घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

Web Title: MNS General Secretary Parashuram Uparkar criticized the government over Diwali ration distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.