दूरसंचारच्या मनोऱ्याने मोबाईल खणखणले, सोनुर्लीत सेवा कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:34 AM2019-04-01T11:34:28+5:302019-04-01T11:36:39+5:30
अन्न, वस्त्र व निवारा या जीवनातील तीन मूलभूत गरजांमध्ये आता मोबाईल फोनची भर पडली आहे. पण फोन असूनही त्याला नेटवर्क नसेल तर त्याचा उपयोग काय? अशीच काहीशी परिस्थिती सोनुर्लीत पाहायला मिळत होती. मात्र, बीएसएनएलने उभारलेला मनोरा कार्यान्वित झाला आणि सर्वांची गरज बनलेला हातातील मोबाईल खणखणू लागला.
सावंतवाडी : अन्न, वस्त्र व निवारा या जीवनातील तीन मूलभूत गरजांमध्ये आता मोबाईल फोनची भर पडली आहे. पण फोन असूनही त्याला नेटवर्क नसेल तर त्याचा उपयोग काय? अशीच काहीशी परिस्थिती सोनुर्लीत पाहायला मिळत होती. मात्र, बीएसएनएलने उभारलेला मनोरा कार्यान्वित झाला आणि सर्वांची गरज बनलेला हातातील मोबाईल खणखणू लागला.
तालुक्यातील सोनुर्ली गाव हा श्री देवी माऊलीच्या लोंटागणाच्या जत्रेने प्रसिध्द आहे. याच जत्रेने राज्याच्या पाठीवर सोनुर्लीची ओळख निर्माण केली आहे. मात्र, सर्वत्र मोबाईल नेटवर्कच जाळे विणले असताना सोनुर्ली गाव मात्र त्याला अपवाद होता. गावात कुठल्याच कंपनीचे चांगले नेटवर्क नसल्याने मोबाईल फोन एक प्रकारे खेळणे ठरले होते. कधीतरी वाऱ्याची झुळूक यावी, तसे नेटवर्क आले आणि हातातील मोबाईल वाजला तर वाजला! त्यामुळे ग्रामस्थ गावात मोबाईल मनोरा उभा रहावा, या मागणीसाठी नेहमी आग्रही होते.
आताच्या संगणक युगात हातातील मोबाईल इंटरनेटवरच बरीचशी कामे होतात युवाई यात अग्रेसर असते. शासकीय कामासोबत खासगी कामे इंटरनेटव्दारे झपाझप होत आहेत. त्यामुळे नेटवर्क नाही, तर इंटरनेट नाही, अशीच अवस्था सोनुर्लीवासीयांची झाली होती.
दरम्यान, बीएसएनएलच्या माध्यमातून सोनुर्लीत अलिकडेच मनोरा उभारण्यात आला होता. मनोऱ्याचे काम युध्दपातळीवर करुन हा मनोरा गेले कित्येक दिवस सुरु करण्याच्या तयारीत होता. मात्र, नेमका मुहूर्त अधिकाऱ्यांना सापडत नव्हता. त्यामुळे वैतागलेल्या गावातील युवकांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यालयात जात जाब विचारला व आजच्या आज मनोरा कार्यान्वित करण्याचा इशारा दिला.
त्यामुळे खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी सायंकाळपासून हा मनोरा सुरु केला.मनोरा सुरु होताच गावात मोबाईल फोन खणखणू लागले. त्याचबरोबर थ्रीजी इंटरनेट सेवाही मिळू लागल्याने खेळणे बनलेला मोबाईल फोन तत्काळ सर्वांचा महत्त्वाचा विषय बनला.
टॉवरची क्षमता केवळ एक किलोमीटर
सोनुर्लीत उभारण्यात आलेला हा मनोरा गावच्या एका टोकाला आहे. असे असले तरी या मनोऱ्यांची क्षमता साडेतीन किलोमीटरपर्यंत असणार, असे बीएसएनएलनकडून सांगण्यात आले होते.
मात्र, यासंदर्भात संबंधित मोबाईल विभागाच्या व्ही. व्ही. सूर्यवंशी यांच्याकडून माहिती घेतली असता, टॉवरची क्षमता एक किलोमीटरच आहे आणि तो पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आला असून, एक किलोमीटरच्या आतच त्याचा चांगला फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले.