जलयुक्त शिवारसाठी मोबाईल व्हॅनची फेरी
By admin | Published: May 10, 2016 09:22 PM2016-05-10T21:22:17+5:302016-05-11T00:09:52+5:30
पाणी नियोजनाची दिली जातेय माहिती-माजगाव, मळगाव, नेमळेत उत्साही स्वागत
तळवडे : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत प्रचार व जनजागृतीसाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे मोबाईल व्हॅनद्वारे फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमाचा प्रारंभ माजगाव, मळगाव, नेमळे या गावांतून करण्यात आला.
सध्या दुष्काळाचे चटके महाराष्ट्राला बसत असताना शासनामार्फत विविध योजना व प्रकल्पांतून पाणी नियोजन व पाण्याच्या बचतीवर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जलशिवार योजनेचा प्रारंभ
करून महाराष्ट्रभर त्याची
काटेकोर अमंलबजावणी करण्यात आली.
त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या योजनेद्वारे पाण्याचे नियोजन व नियोजनासाठी राबविण्यात येणारे उपचार मातीनाला बांध, सिमेंट नालाबांध, वळण बंधारे, समतोल चर, गाळ काढणे, मजगी व लघू पाटबंधारे विभाग जिल्हा परिषदेकडून बांधण्यात येणारे सिमेंट नालाबांध याविषयी प्रबोधन केले जात आहे.
शेतकरी वर्गाने या योजना यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे. कोणतीही योजना यशस्वी करायची असल्यास ग्रामस्थ व शेतकरी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभते. त्यामुुळे शेतकऱ्यांनी याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे. कार्यक्रमाचे मळगावचे सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर, कृषी सहायक सी. जी. मेस्त्री, कृषी पर्यवेक्षक सी. जी. मेस्त्री, कृषी पर्यवेक्षक आर. एल. घावरे, विजय राऊळ तसेच मळगावचे ग्रामस्थ व शेतकरी वर्ग व अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा
आज बदलत्या हवामानानुसार व निसर्गातील बदलामुळे भूमीवरील पाणीसाठा कमी होत चालला आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. कृषी विभाग, लघू पाटबंधारे विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग व जलसंपदा विभागामार्फत ही कारवाई केली जाते. त्यामुळे या योजनेचा योग्य अवलंब झाला आहे. पावसाचा थेंबन्थेंब जमिनीत मुरून जमिनीतील पाण्याची पातळी वाढविली जात आहे. यात शेतकरी वर्गाने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.